प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने जनहित याचिका दाखल.
मुंबई महानगरपालिकेत विविध माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून भरती होतांना, परराज्यातील अनेक उमेदवारांनी त्यांच्या राज्यातील मूळ जातीच्या दाखल्या आधारे महाराष्ट्रात खोटे जात दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करुन (उल्हासनगर पॅटर्न) आरक्षित जागेवर नोकरी मिळविलेली आहे.
इतर राज्यातील उमेदवारांना त्यांच्या जातीचा लाभ महाराष्ट्रात घेता येणार नाही,असा कायदा असल्याने, व त्यामुळेच इतर राज्यातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र देऊ नये असे आदेश असल्याने, अनेक उमेदवारांनी महाराष्ट्रातील खोटे जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे तयार करुन महानगरपालिकेत नोकरी मिळविलेली आहे. या सर्व घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी आयोग नेमावा अशी मागणी करणारी जनहित याचिका विकास घुगे अध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आली असून संघटनेचे विधी सल्लागार म्हणून ऍड.एकनाथ ढोकळे यांचेमार्फत मा. मुंबई उच्च न्यायालयात काम पाहिले जाणार आहे.
यावर लवकरच मा.उच्च न्यायालयात सुनावणी होऊन खऱ्या अर्थाने वंचीत घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी व्यक्त केली.