Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडालातूरकारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ऊरी चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

कारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ऊरी चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

-माजी सैनिक कल्याणमंत्री, संभाजी पाटील-निलंगेकर

लातूर /प्रतिनिधी : देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जात असून, या दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्याची भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता राज्यशासनाने मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटागृहात उरी – द सर्जिकल स्ट्रईक या राष्ट्राप्रति अभिमान व्यक्त करणाऱ्या चित्रपटाचे प्रक्षेपण खास तरुण वर्गासाठी करण्यात येणार असून, राष्ट्रकर्तव्याची भावना तरुणाच्या मनी निर्माण करण्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी केले.

माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सह्रयाद्री अतिथीगृह मुंबई येथे घेण्यात आलेल्या बैठकीत यासंबधी चित्रपटाचे वितरक, सिनेमागृहाचे मालक, चित्रपट संघटना इत्यादी बरोबर चर्चा केली असून, कारगिल विजयदिनाचे महत्व पाहता हा चित्रपट मोफत दाखविण्याचे शासनाकडून योग्य नियोजन केले गेले आहे, असे देखील निलंगेकर म्हणाले. यावेळी बैठकीस विभागाच्या प्रधान सचिव, श्रीमती. वल्सा नायर व संबधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

२६ जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता चित्रपट प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहत होत असून चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटना यांनी देशप्रती असलेले कार्य मानून यास सहमती दिलेली आहे. त्यामुळे या कारगिल विजय दिनी खऱ्या अर्थाने भारतमातेच्या सर्व सुपूत्रांचा उर उभिमानाने भरुन येईल.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून १८ ते २५ वर्ष वयोगटातील युवकांनी या सिनेमाव्दारे प्रेरित व्हावे असा उद्देश आहे. तरी, या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयातील सर्व चित्रपटगृह चालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी अशा सूचना निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या. सदर कार्यक्रमाचे परिपत्रक शासनाव्दारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.

१९९९ मध्ये पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती लष्कराला मिळाली यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात ही सैनिक कारवाई करण्यात आली. मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगिल युद्ध ७७ दिवस चालले. नियंत्रण रेषेपलिकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानला या युद्धात हार पत्करायला लावली. तेव्हापासून कारगिल विजय दिवस संपूर्ण देशात अभिमानाने साजरा करण्यात येतो.

जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर १८ सप्टेंबर २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाला. या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. भारतानं या हल्ल्याचा बदला घेतला. यावर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांनी या घटनेचा अभ्यास आणि संशोधन करुन चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला. भारतील लष्कराच्या इतिहासातील हा पहिलाच सर्जिकल स्ट्राईक होता. देश रक्षण तसेच सैनिकांची देशाप्रति असलेली भावना यथोचित या चित्रपटात मांडण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने हा चित्रपट तरुणांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. त्यामुळे येत्या २६ जुलै रोजी, कारगिल विजय दिनी सर्व तरुणवर्गाने हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात जरुर पहावा असे आवाहन शेवटी निलंगेकर यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments