Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादपूजा चव्हाणची हत्या नव्हे आत्महत्याच : मंत्री धनंजय मुंडे

पूजा चव्हाणची हत्या नव्हे आत्महत्याच : मंत्री धनंजय मुंडे

pooja-chavans-death-is-suicide-says-minister-dhananjay-munde
pooja-chavans-death-is-suicide-says-minister-dhananjay-munde

औरंगाबाद: टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचवेळी यावरून राजकारणही तापलं असून भाजपचे राज्यातील नेते ठाकरे सरकारवर चौफेर हल्ले करत आहेत. या प्रकरणावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून हा केवळ आत्महत्येचाच प्रकार असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे.

बीडमधील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असतानाच काही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट आरोप केले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणखी कशाची वाट पाहत आहेत. ताबडतोब राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीअंती कारवाईची भूमिका घेतली आहे. काही लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने काळजीपूर्वक पावले टाकली जाणार आहेत. या प्रकरणात चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली आहे.

पूजा चव्हाणची हत्या नाही तर तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे, असे धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. एकदा सगळं काही स्पष्ट झालं की त्यावर अधिक बोलता येईल, असेही मुंडे पुढे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनासुद्धा एका प्रकरणात लक्ष्य करण्यात आलं होतं. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने या प्रकरणातील हवा निघाली होती. या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण प्रकरणात सत्य समोर आल्यानंतरच बोलायला हवं अशी भूमिका मांडून मुंडे यांनी एकप्रकारे सहकारी मंत्री संजय राठोड यांची बाजू घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments