ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार अभिजीत बांगर यांनी आज स्वीकारला. मावळते आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अभिजीत बांगर यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे सुपूर्द केली.
ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००८च्या बॅचचे आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त होते. अर्थशास्त्र या विषयात पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण झालेल्या अभिजीत बांगर यांनी २०१०मध्ये रायगड जिल्ह्यात माणगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस सुरूवात केली.
त्यानंतर, अलिबाग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे जिल्हाधिकारी, अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. नवी मुंबईत येण्यापूर्वी ते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते. कोरोना काळात त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सांभाळला.
‘नागरिकांच्या सहभागाने एकत्र काम करू’ – अभिजीत बांगर
कोणत्याही शहराची स्वत:ची वैशिष्ट्ये असतात. तशी ती ठाण्यासारख्या पारंपरिक शहराचीही आहेत. जुन्या शहरात काम करण्याची संधी असते, तशीच आव्हानेही असतात. या शहरात काम करताना नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असतो. ठाणेकरांना ठाणेकर असल्याचा अभिमान वाटतो. त्यातून शहरासाठी काहीतरी करण्याची त्यांना उर्मी असते. त्याचा उपयोग करून, नागरिकांच्या सहभागाने एकत्र काम करू, असे नवनियुक्त प्रशासक तथा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले.
Web Title: Abhijit Bangar took charge of the post of Thane Municipal Administrator and Commissioner