मुंबई: ज्या पध्दतीने सरकार पाडण्यासाठी भाजप वेळ खर्च करत आहेत. सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. त्यांना का घाबरायचं असा सवाल केला आणि आता आम्ही लढणार. जो घाबरला तो संपला, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
21 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अनेक संकटे आली. मात्र, आम्ही मजबुतीने एकत्र राहिलो. गेल्या पाच वर्षातही आमच्या अडचणीमुळे सत्तेत जात असल्याचे सांगून काही लोक राष्ट्रवादीला सोडून निघून गेले. या सगळ्यानंतरही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.
गुरुवारी मुंबईत मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आसिफ शेख यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. बर्याच दिवसापासून आपली वाट पहात होतो. काँग्रेसला आम्ही याची कल्पना दिली आहे. कोरोना काळात मालेगावमधील सर्वांना आसिफ शेख यांनी विश्वासात घेऊन प्रवेश घेतला आहे. मालेगावमधील लोकांना पवारसाहेबांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
आपल्या राजकीय जीवनात अठरापगड जातींना घेऊन काम केले आणि करत आहेत. ही आपलेपणाची भावना राष्ट्रवादी काँग्रेस ठेवत आल्याने आज माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले.
आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे असेही अजित पवार म्हणाले.
यावेळच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज देण्यात आले तसा असंघटित कामगारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डीपीडीसीमध्ये जास्तीचा निधी नाशिकला दिला जाईल असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले शिवाय राष्ट्रवादी आजपासून तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.