पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र लोकनेते उत्कृष्ट संसदपटू माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात रविवारी (३. ३० वा.) अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील समर्थकांची कासार पिंपळगावकडे रीघ लागली. रविवारी सकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अश्रू अनावर झाल्याने अनेकांना मूर्च्छा आली. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव व पंचक्रोशीतील गावात बंद पाळण्यात आला. कासार पिंपळगावात चुलबंद ठेवून राजळेंना आदरांजली वाहण्यात आली. तिसगाव-शेवगाव-पैठण राज्यमार्गावर ‘राजाभाऊ परत या, राजीव राजळे अमर रहे, असेन मी नसेन मी कर्तृत्वातून दिसेन मी’, अशा घोषवाक्याचे फ्लेक्स लावून विविध संस्था व व्यक्तिगत पातळीवर श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. दुपारी दोन वाजेदरम्यान हार फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून राजाभाऊंची अंत्ययात्रा वृद्धेश्वर कारखानामार्गे शेवगाव रोडने टाळ मृदंगाच्या गजरात निघाली. ठीक ३.३० वाजता त्यांचे जेष्ठ सुपुत्र कृष्णा व कनिष्ठ बंधु राहुल यांनी राजाभाऊंच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यानंतर तेथेच शोकसभा झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आ. सुधीर तांबे, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, कामगार नेते नितीन पवार, तारकेश्वर गडाचे महंत आदीनाथ महाराज शास्री, अशोक महाराज कर्डिले, वैभव पिचड, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राजेंद्र नागवडे, रिपाइंचे अशोक गायकवाड, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाप्पूसाहेब भोसले, अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, शिवाजी गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, बबनराव पाचपुते, दादापाटील शेळके आदींची श्रद्धांजली वाहिली़ पैठण येथील राजेंद्र मांडे गुरुजी, संजुदेवा मुळे व त्यांच्या सहका-यांनी यमसुक्ताचे पठन करून मंत्राग्नीची कार्यपूर्ती केली.