Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडारोहित शर्मा ठरला सामनावीर आणि मालिकावीर

रोहित शर्मा ठरला सामनावीर आणि मालिकावीर

cricket team
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारतानं एक डाव आणि तब्बल २०२ धावांनी जिंकला आहे. आफ्रिकेविरुद्धचा हा भारताचा सलग तिसरा कसोटी विजय असून या विजयासह भारतानं ही मालिका ३-० अशा फरकानं खिशात घातली आहे. चौथ्या दिवशी ८ बाद १३२ धावांवरून डाव पुढं सुरू करणाऱ्या आफ्रिकेचा डाव भारतानं आज अवघ्या ९ मिनिटांत गुंडाळला आणि निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेवर भारतानं मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा मालिका विजय आहे.

भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर आणि दुसरा 133 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे. भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. भारताकडून दोन्ही डावात मिळून उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 5, शाबाज नदीमने 4, रवींद्र जाडेजाने 3, आर अश्विनने एक विकेट घेतली.

त्याआधी पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या झुबेर हमजा एकमेव या फलंदाजाचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 162 धावांत आटोपला. त्यामुळे पाहुण्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती.

तर टीम इंडियाने आपला पहिला डाव नऊ बाद 497 धावांवर घोषित केला होता. सलामीवीर रोहित शर्माने कसोटीत कारकीर्दीतलं पहिलं द्विशतक झळकावलं. रोहितने 212 धावांची द्विशतकीय खेळी केली, तर अजिंक्य रहाणेनंही 115 धावांची खेळी उभारली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडेने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर कगिसो रबाडानं तीन विकेट्स घेतल्या.

या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला भारताने पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला आहे.संपूर्ण मालिकेत दोन शतक आणि एक द्विशतक ठोकणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर किताब देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments