पुणे: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याआधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली. फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी तयार करण्यासाठी भर द्यावा, यासाठी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख केल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेत साळगावकर यांचे निलंबन केले. पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगनंतर सामना खेळवला जाणार का? यावर आयसीसीचे मॅच रेफ्री निर्णय घेतील, अशी माहिती बीसीसीआयचे कार्यवाह सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल समजली जाते. या खेळपट्टीवर भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. यावेळी देखील खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या मैदानात आतापर्यंत दोन वन डे सामने खेळले आहेत. यापैकी भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ७२ धावांनी पराभूत केले होते. तर यंदाच्या जानेवारीत विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडला ३ गडी राखून पराभूत केले होते. यावेळी भारताने इंग्लंडने दिलेल्या ३५१ धावांचे आव्हान परतवून लावले होते.