मुंबई : भारतीय महिला हॉकी संघानं पुन्हा एकदा भारताची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. जपानमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत चीनवर मात करत दुसऱ्यांदा या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.
जपानमध्ये सध्या आशिया चषक हॉकी स्पर्धा सुरु आहे. भारतीय महिला हॉकी संघानं पेनल्टी शूटआउटवर चीनवर ५-४ अशी मात करून आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. आशिया चषकाच्या इतिहासात भारतानं विजेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारतीय महिला संघानं २००४ साली आशिया चषक जिंकला होता.
यंदा जपानच्या काकामिगाहारु येथे खेळवण्यात आलेल्या आशिया चषकावर भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. अंतिम फेरीत दाखल होण्याआधीच्या पाचही सामन्यांमध्ये भारतानं विजय मिळवला होता. या सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी गोल बरोबरी झाल्यानं पेनल्टी शूटआउटवर निर्णय देण्यात आला. भारताकडून अंतिम सामन्यात नवज्योत कौरनं निर्णायक गोलची नोंद केली.