नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी पर्याय सुचवला आहे. महिला क्रिकेटला अधिकाधिक प्रसिध्दी मिळण्यासाठी महिला क्रिकेट सामन्यांचे टीव्हीवरून मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपण होण्याची गरज असल्याचे मत मितालीने मांडले आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र भारतीय संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. या विश्वचषकाला भारतातून सुमारे दहा कोटी प्रेक्षक लाभले होते.
एका मुलाखतीमध्ये महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याबाबत मिताली राज म्हणाली, ” लोकांना महिला क्रिकेटकडे अधिकाधिक आकर्षित करून महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांच्या सामन्यांचे टीव्हीवरून जास्तीत जास्त थेट प्रसारण झाले पाहिजे. त्यामुळे महिलांचे क्रिकेट सामने पाहिले जातील महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळेल.” त्याबरोबरच भारतीय महिला क्रिकेट संघाने जास्तीत जास्त क्रिकेट सामने खेळण्याची गरज असल्याचेही तिने सांगितले. ” आम्ही जास्तीत जास्त क्रिकेट सामने खेळले पाहिजेत. तसेच टी-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारचे क्रिकेट सामने खेळले पाहिजे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीमध्ये सातत्य राहील.”
ती पुढे म्हणाली, “पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटबाबतही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. भारतीय महिला संघाने कोणत्याही द्विपक्षीय मालिकेचे आयोजन केल्यास किंवा देशाबाहेर खेळायला गेल्यास त्याबाबत प्रसिद्धी व्हायला हवी, त्यामुळे लोक आमचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतील किंवा टीव्हीवरून थेट प्रक्षेपण पाहतील. त्यामुळे खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल, मात्र सध्या यापैकी काहीच होत नाही.”
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय स्तरापासून मुलींना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकाळापासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिताली राज हिने फॉर्म आणि फिटनेस कायम राहिल्यास २०२१ च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.