नवी दिल्ली: कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत बलाढय़ अमेरिकेला कडवा प्रतिकार करून पराभव पत्करणारा भारतीय संघ कोलंबियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी रात्री ८ वाजता होणाऱ्या ‘अ’ गटातील लढतीत उभय संघ भिडतील.
भारताला सलामीच्या लढतीत अमेरिकेकडून ०-३ फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने अमेरिकेला कडवा प्रतिकार केला, पण गोल करण्याच्या कौशल्यामध्ये ते कमी पडले. दुसरीकडे कोलंबियालाही सलामीच्या लढतीत घानाकडून ०-१ फरकाने हार पत्करावी लागली होती. त्यामुळे नवख्या भारताला हरवून गुण वाढविण्यासाठी घाना सर्वस्व पणाला लावेल. यजमान भारताला नायगरकडून प्रेरणा घेऊन आगामी लढतीत मैदानात उतरावे लागेल. या आफ्रिकी देशाने उत्तर कोरियाला पराभूत करून आपल्या अभियानास यशस्वी प्रारंभ केला. भारतीय संघाचे प्रशिक्षक लुई नोर्टन डी माटोस म्हणाले, कोलंबियाविरुद्ध अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही कडवी लढत देऊ. कोलंबिया संघ सरस असल्याची आम्हाला जाण आहे, मात्र आम्ही खडतर आव्हानसाठी सज्ज आहोत. कोलंबियाविरुद्ध विजय मिळविल्यास तो भारतासाठी ऐतिहासिक विजय ठरणार आहे.
विजयी संघ भिडणार
अ गटात अमेरिकेने यजमान भारताला ३-० फरकाने, तर घानाने कोलंबियाला १-० फरकाने हरविले. आता सोमवारी सायंकाळी ५ वाजता दुसऱ्या साखळी लढतीत कोणता संघ सलग दुसरा विजय मिळविणार याकडे फुटबॉलशौकिनांचे लक्ष असेल.
आजच्या लढती
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम
तुर्की वि. माली, सायंकाळी ५ वाजता
पॅराग्वे वि. न्यूझीलंड, रात्री ८ वाजता
जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली
घाना वि. अमेरिका, सायंकाळी ५ वाजता
भारत वि. कोलंबिया, रात्री ८ वाजता.