Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक

गुवाहाटीतील दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयानंतर हॉटेलवर परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक झाली आहे. बारसापारा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ हॉटेलवर परतत होता. त्याचवेळी संघाच्या बसवर दगडफेक झाली. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर अॅरॉन फिंचने ट्विटरवर या घटनेचा फोटो ट्विट केला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक झाल्याच्या घटनेचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विटरवर पोस्ट केला. ‘हॉटेलवर परतत असताना बसवर दगडफेक झाली. हा प्रकार अतिशय भितीदायक होता,’ असे फिंचने ट्विटमध्ये म्हटले आहे. फिंचचे ट्विट काही वेळानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार डेव्हिड वॉर्नरने रिट्विट केले, तर मॅक्सवेलने हे ट्विट लाईक केले. याबद्दल अद्याप बीसीसीआय, आयसीसी किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीत झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सफाईदार विजय मिळवला. भारतीय संघाने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. या सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ ठरला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात भारताला दोन धक्के दिले. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला माघारी धाडले. यानंतर ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. बेहरनडॉर्फने आघाडीच्या ४ फलंदाजांना बाद करत भारताचे कंबरडे मोडले. सुरुवातीच्या या धक्क्यांमधून सावरण्यात भारतीय संघाला अपयश आले.

भारताने दिलेल्या ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारुंना भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने सुरुवातीला दोन धक्के दिले. मात्र ट्रेविस हेड आणि हेन्रिकेज यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासोबत ऑस्ट्रेलियन संघ भारताची विजयी घौडदौड रोखण्यातही यशस्वी ठरला. गेल्या आठ टी-२० सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. मात्र गुवाहाटीतील पराभवाचे भारताचा विजयरथ रोखला गेला आहे. यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये भारताने वर्चस्व राखले आहे. वर्षाच्या सुरुवातील झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला होता. यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments