लिंग बदलाची शस्त्रक्रिया करणारा नौदल अधिकारी निलंबित

लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुषाची महीला झालेल्या एका नौदल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मनीष गिरी असे त्या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून तो आयएनएस ईकसीलावर कमांडींग ऑफिसर म्हणून कार्यरत होता. मनीषने भरतीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने संरक्षण मंत्रालयाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नौदलात नाविक पदावर फक्त पुरूषांची भरती केली जात असल्याने त्याला निलंबीत केल्याचे समजते.

मनीष गिरी २०११ ला ईस्टर्न नेव्हल कमांडच्या मरीन इंजिनियरिंग विभागात नाविक म्हणून भरती झाला होता. सध्या तो नौदलाच्या विशाखापट्टनम येथील तळावर आयएनएस ईकसीलावर कार्यरत होता. मनीषने ऑगस्ट महीन्यात दिल्लीतील एका रुग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रीया केली. या शस्त्रक्रियेनंतर त्याने स्वत:चे नाव बदलून साबी असे ठेवले आहे.

“ऑगस्ट महीन्यात मनीष २२ दिवसांसाठी रजेवर गेला होता. त्या रजेदरम्याम त्याने दिल्लीतील एका रुग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मनीष जेव्हा पुन्हा कामावर रुजू झाला त्यावेळी त्याने महिलांसारखे केस वाढवले होते. तो साडीही नेसू लागला होता. त्याचे ते रुप बघून आम्हाला धक्का बसला होता. मनीषने भरतीच्यावेळी स्वत:चा उल्लेख पुरूष असा केला होता. त्याच्या या लिंग बदलामुळे भरतीच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्याबाबत आम्ही संरक्षण मंत्रालयाला कळविले होते. संरक्षण मंत्रालयाने त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मी गेले वर्षभर मानसिक तणावातून जातोय. माझ्यात होणाऱ्या बदलांविषयी मी वेळोवेळी वरिष्ट अधिकाऱ्यांना सांगितले पण त्यांनी कायम मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. नौदलात १८ -१९ व्या वर्षी तरुण भरती होतात, त्यानंतर जर त्यांच्यात काही बदल होत असतील तर त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

– मनीष गिरी उर्फ साबी

महाराष्ट्रातील जनतेचे आभार : नरेंद्र मोदी

मुंबई: विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ट्विट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आता ग्राम पंचायत निवडणुकीतील यशाबद्दलही ट्विट केलं आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं ट्विट मोदींनी केलं आहे.

“राज्यभरातील ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक आभार” असं मोदी म्हणाले.

गुजरातमध्ये १४ डिसेंबर ते १४ जानेवारीत निवडणूका घेण्याची भाजपाची मागणी

नवी दिल्ली : भाजपने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला पत्र लिहून एक सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात निवडणूक घेण्याबाबत विचार करावा, असा सल्ला भाजपने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

हा लग्नसराईचा मोसम नसतो किंवा या काळात सणही जास्त नसतात. त्यामुळे मतदार जास्त प्रमाणात सहभागी होतील, असं भाजपने म्हटलं आहे. शिवाय राजकीय पक्षांचे प्रचार कार्यालयं आणि मतदान केंद्र यांमधील अंतर कमी करावं, अशी मागणीही भाजपने केली आहे. भाजपचे लीगल सेल प्रभारी परींदु भगत आणि प्रशासकीय प्रभारी कौशिक पटेल यांच्या वतीने निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलं आहे.

१४डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात लग्नसराई नसते. हा काळ हिंदू धर्मात अशुभ मानला जातो. तर १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या काळात सर्वात जास्त लग्न होतात. हे लक्षात घेता १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात निवडणूक घ्यावी. सर्व पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी ही तारीख योग्य राहिल, असं भाजपने म्हटलं आहे.

निवडणूक ही उत्सवाप्रमाणे साजरी केली पाहिजे. त्यामुळे यामध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे, असं म्हणत भाजपने सर्व पक्षांची बैठक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सनी लिओनीच्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

मुंबईसनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेकांना तिने तिच्या अदांनी घायाळ केलंय. सनी लिओनीने हिंदी चित्रपटांत काम केलंच आहे, याशिवाय तमिळ, मराठी, कन्नड चित्रपटांमध्येही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली आहे. शिवाय तिची काही आयटम सॉंग गाजली आहेत. सनी लिओनीबद्दल अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीये. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात.

सनीचं पदार्पण खरंतर २००५ साली आलेल्या कलियुग चित्रपटातून होणार होतं. मात्र तिने या चित्रपटासाठी १० लाख रूपये मागितले होते, ज्यामुळे चित्रपट दिग्दर्शकाने तिला नकार दिला होता.

सनी प्रचंड वाचनप्रेमी आहे, तिला पार्टी करण्यापेक्षा पुस्तकं वाचणं आवडतं.

सनीला वाचनासोबतच खाण्याची देखील प्रचंड आवड.

डेनियल वेबर सोबत लग्न होण्याआधी तिचा मॅट एरिक्सन याच्याशी साखरपुडा झाला होता.

जगप्रसिध्द हास्यकलाकार रसेल पिटर सोबतही तिचे प्रेमसंबध होते.

बेबी डॉल ही खूप घाबरट असून तिला किडे, मुंग्यांची खूप भिती वाटते.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती एका जर्मन बेकरीत काम करत होती.

तिच्या कोणत्याही चित्रपटाचे स्क्रिप्ट हे पहिले तिचा नवरा डेनियल वेबरने वाचतो, त्याने होकार दिल्यानंतरच सनी चित्रपट स्वीकारते.

राम जेठमलानी येणार मोठ्या पडद्यावर

मुंबई – बायोपिक म्हणजेच चरित्रपटांचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. विविध खेळाडूंपासून ते उल्लेखनीय व्यक्तींपर्यंत अनेकांचेच बायोपिक साकारण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकरपासून ते अगदी सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यातले बहुतेक बायोपिक हे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.

आता अजून एक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध असलेले जेष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘नो वन किल्ड जेसिका’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता जेठमलानी यांच्यावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बिग बी अमिताभ बच्चन जेठमलानी यांची भूमिका साकारणार असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलं आहे. सुझेन अॅडेलमन यांनी जेठमलानी यांच्यावर लिहिलेल्या ‘द रिबेल’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत.एकीकडे बिग बींना जेठमलानी यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं असून तरुणपणीचे जेठमलानी कोण साकारणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांची दांडी!

मुंबई: सिंचन घोटाळ्याचा डाग लागलेले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत मंचावर बसण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे. तटकरेंवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला फडणवीसांनी हजेरी लावली नाही.

सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीला आज ३० वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र विरोधात असताना सिंचन घोटाळ्यांवरुन ज्यांच्या अटकेची मागणी फडणवीस यांनी केली होती, तेच आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं टाळलं असलं तरी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीष बापट यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला नारायण राणे यांचीही उपस्थिती असल्यानं त्यांच्यासोबत मंचावर बसण्याचं शिवसेनेच्या संजय राऊतांनीही टाळलं आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविंद्र नाट्य मंदिराबाहेर निदर्शनं केली आणि कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतलं. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या तटकरेंच्या कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी कसे उपस्थित राहतात, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

पेट्रोल प्रतिलिटर दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली. त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी होतील. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राकडून हे पाऊल उचलण्यात आले.

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २५ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २६ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे ११ रुपयांचा अधिभार आकारला जातो. डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २१ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २२ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला १९ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. मात्र, आता व्हॅट कमी केल्याने सरकारला २८०० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. २०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमती त्यातुलनेत कमी होऊनदेखील पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर या दरानेच मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे पेट्रोल- डिझेलचे दर कमी होत नव्हते. यामुळे केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू होती. विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जनतेच्या या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने गेल्या मंगळवारीच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले होते.

साऊथ इंडस्ट्रीत कमालीची बोल्ड बनली होती श्रुती!

मुंबई – मराठीतील सुंदर अभिनेत्री म्हणुन श्रुती मराठेची ओळख आहे. निराग चेहरा आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर श्रुतीने मराठी इंडस्ट्रीमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राधा ही बावरी या मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठी घरात पोहोचली. नेहमी साडी अथवा ड्रेसमध्ये वावरणारी श्रुतीने अनेक मराठी आणि मालिकांमध्येही काम केले आहे.

जेव्हा बोल्ड बनली साधीभोळी श्रुती…
२००८  साली आलेला चित्रपट Naan Avanillai 2 या तामिळ सिनेमात श्रुती सर्वप्रथम झळकली. या चित्रपटात तिने जीवन या तामिळ अभिनेत्यासोबत अभिनय केला होता. पण श्रुतीच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसचीच जास्त चर्चा झाली. साध्यासुंदर श्रुतीचा हा लुक पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. श्रुतीने Aadu Aata AaduKannada, Vidiyal,Aravaan या तामिळ चित्रपटात काम केले आहे.

बोल्डनेसवर श्रुतीने केले होते असे वक्तव्य…
साऊथ चित्रपटात इतके बोल्ड सीन दिल्याबद्दल श्रुतीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले की, “मी नुकतीच कॉलेजमधून पास झाले होते आणि या चित्रपटाची ऑफर आली. लहान असल्यामुळे मला त्यावेळी बोल्डनेसची सीमा काय ठेवावी ते कळाले नाही. पण आता त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो असेही नाही. असा रोल करण्याचे मुळ कारण हे होते की साऊथ इंडस्ट्रीत मला कोणी ओळखत नाही. आईवडील-नातेवाईक तिथे नसल्याने मी असे सीन केले. मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलायचे झाले तर मला येथेही बोल्ड सिनेमे करण्यास हरकत नाही.”

मुंबई काँग्रेसचे अमित शहांविरोधात निदर्शने

मुंबई-भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसने आझाद मैदानाजवळ निदर्शने केली आहेत. खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली ही निर्दशने करण्यात आली.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तर कार्यकर्त्यांनी बाप नंबरी बेटा १० नंबरी अशा घोषणा दिल्या. अटक करा, अटक करा, अमित शहाला अटक करा अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. मनी लॉन्ड्रिंगमुळे नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अमित शहा यांनी नैतिकता ओळखून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

व्यंगचित्राच्या ‘टीकेनंतर’ बदल घडेल का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पेज लाँच केले त्या दिवसापासून चर्चेचा विषय झाला आहे. ठाकरे हे आपल्या व्यंगचित्रातून फटकारे देण्याचे काम करत आहेत. पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील ‘परतीचा पाऊस’ भाजपसाठी तापदायक ठरत असल्याचा टोला या व्यंगचित्राच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे, यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या वापरावरुन भाजपवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. पेट्रोल- डिझेलचे वाढते दर, महागाई, आश्वासनांची पूर्तता करण्यात येणारे अपयश यामुळे मोदी सरकारविरोधात देशभरात नाराजी आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. ‘परतीचा पाऊस’ असे या व्यंगचित्रात म्हटले असून सोशल मीडियावरील टीकेने अमित शहा, नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांची बिकट अवस्था झाल्याचे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे. खरतर या सर्व विषयांची चर्चा होत राहिल. विरोधकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणे लोकशाहीमध्ये गैर नाही. माध्यमांनीही जे सरकार असते त्या सरकारच्या विरोधात नेहमी भूमिका ठेवली पाहिजे. सरकार चांगली कामे करत असेल तर त्याचे कौतुकही करायला हवेच. परंतु चुकीचे काम करत असेल तर त्याचे वाभाडेही काढायला मागे पुढे राहाता कामा नये. मोदी सरकार चुकीचे काम करत आहेत. सरकार बद्दल लोकांच्या मनात रोष आहे. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत असतो. आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु त्याचा काहीही परिणाम होतांना दिसत नाही. परिस्थिती सुधारली जात नाही. मनसे अध्यक्ष ठाकरे हे व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्य परिस्थिती समोर मांडत आहेत. त्यांच्या त्या व्यंगचित्रातून जनमानसात एक वेगळा संदेशही चालला. पण परिस्थिती सुधारेल का? आणि सरकारला थोडी जरी शिल्लक उरली असेल तरी त्यांनी स्वत:मध्ये बदल घडवावेत. व जनतेला अच्छे दिन दाखवावेत.