बलात्कार पीडित मूकबधिर तरुणीने बाळाला दिला जन्म

नागपूर –  मूकबधिर तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत एका अज्ञात आरोपीने सतत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणीने बदनामी टाळण्यासाठी स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आठ महिन्यातच तिची प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.

पीडित ३४ वर्षीय मुलगी जन्मापासून मूकबधिर आहे. आई, भाऊ आणि मावस भावासह ती नारी परिसरात राहते. तिची आई व भाऊ मजुरी करतात. आई व भावंडं कामावर निघून गेल्यानंतर ती घरी एकटीच असायची. तिच्या असाह्य़तेचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वी तिचे वाढलेले पोट पाहून आईने तिला विचारणा केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या आईने बलात्कार करणाऱ्यासंदर्भात विचारणा केली. मात्र, मुलीला सांगता येत नव्हते. शिवाय ती बदनामीला घाबरत होती. तिने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तिच्या आईने तिला वाचवले. अखेर ३० सप्टेंबरला सर्वासमक्ष तिने स्वत:च्या अंगावर केरोसीन ओतले व जाळून घेतले. त्यानंतर तिच्या आई व भावंडांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिची पूर्ण साडी जळाली होती. आग विझवल्यानंतर तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार सुरू असताना आठ महिन्यातच तिची प्रसूती झाली व तिने मुलाला जन्म दिला.
तर दुसरीकडे पोलिसांनी एका मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिकेमार्फत मुलीशी संवाद साधला व आरोपीविरुद्ध माहिती विचारली. त्यावेळी तिच्या शाळेत १२ वी पर्यंत शिकत असलेल्या एका तरुणाने हे केल्याचे समजले. त्याला पोलिसांनी शोधले असून हर्षवर्धन असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, डीएनए चाचणीनंतरच आरोपीने बलात्कार केला का? हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी सांगितले.

जय शहांनी घाबरवण्यासाठीच ठोकला अब्रूनुकसानीचा दावा- सिद्धार्थ वरदराजन

शनिवारी ‘द वायर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये दावा केला होता की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या संपत्तीमध्ये कैक पटीने वाढ झाली आहे. या वृत्तामुळे वाद झाला आणि जय शहा यांनी ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन आणि पत्रकार रोहिणी सिंग यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. आम्ही या खटल्याविरोधात न्यायालयीन लढा देऊ, असं वरदराजन यांनी म्हटलं आहे.

हे वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वीच आपल्याला धोक्याचा अंदाज आला होता, असं ते म्हणाले. जय शहा यांच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की जर तुम्ही हे वृत्त प्रसिद्ध केलं तर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा ठोकू.

आरएसएस महिला विरोधी-राहुल गांधी

बडोदा – गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच येथे नेत्यांच्या दौऱ्यांनी वातावरणात रंगत आणली आहे. राहुल गांधी सोमवारपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काँग्रेस उपाध्यक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) महिला विरोधी म्हटले आहे. ते म्हणाले संघाच्या शाखांमध्ये फक्त पुरुषांना प्रवेश असतो तिथे तुम्ही कधी महिलांना शॉर्ट्समध्ये पाहिले आहे का? राहुल गांधींनी अमित शहांचे चिरंजीव जय शहांच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजपची विचारधारा ही महिला विरोधी आहे. महिलांनी शांत राहावे. त्या जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत यांना मान्य असतात. त्यांनी बोलण्यास सुरुवात केली, प्रश्न विचारले की हे (भाजप विचारधारेचे लोक) त्यांना चूप करतात. यांची मुख्य संघटना आरएसएस आहे. आरएसएसमध्ये किती महिला आहे, माहित आहे का? त्यांच्या शाखांवर कधी महिलांना शॉर्टस घातलेले पाहिले का? मी तरी अजून पाहिले नाही.’

‘मोदी फक्त सेल्फीची मजा घेत आहे’
– राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले, ‘तुम्ही (मोदी) फक्त सेल्फीची मजा घेत आहेत. मात्र या फोनने चीनी युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. हे फोन मेड इन चायना आहे. मोदींचा फोकस रोजगारावर नाहीच.’

शहांचा मुलगा स्टार्टअप इंडियाचा आयकॉन
– अमित शहांचा मुलागा जय शहाच्या कंपनीला गेल्या दोन-तीन वर्षात झालेल्या फायद्यावरुन राहुल गांधींनी त्यांना स्टार्ट अप इंडियाचा आयकॉन म्हटले आहे.

– ते म्हणाले, ‘तुम्हाला स्टार्ट अप इंडिया माहित आहे का? स्टार्ट अप इंडियाचा आयकॉन जय शहाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? मात्र भारताचे ‘चौकीदार’ यावर मौन बाळगून आहेत. त्यांना अशा गोष्टींबद्दल बोलायला आवडत नाही.’

विकास थापा ऐकून वेडा झाला…
विकास वेडा झाला आहे, या वक्तव्याचा पुनरुच्चार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. गुजरातच्या खेडा येथे बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये विकास थापा ऐकून ऐकून वेडा झाला आहे. सोमवारपासून ३ दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांचे सोमवारी अहमदाबादेत आगमन झाले. गेल्या १० दिवसांतील हा त्यांचा दुसरा गुजरात दौरा आहे. गेल्या वेळी ते २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान सौराष्ट्रातील ५ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. या वेळी ६ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

खेडा येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘जीएसटीमध्ये लहान व्यापारी दर महिन्याला ३ फॉर्म कसे भरणार?’ असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, एका प्रश्नाचे उत्तर न देता मोदी यांनी नोटाबंदी केली. लहानातील लहान मुलगाही यामुळे झालेले नुकसान सांगेल. आमचे दुकान रोख व्यवहारावर चालते, असे तो म्हणेल. गुजरातेत काँग्रेस सत्तेवर आली तर आम्ही ‘मन की बात’ करणार नाही. तुमच्या मनातील गोष्ट ऐकून घेऊ. सध्या देशासमोर सर्वात मोठे आव्हान रोजगाराचे आहे. एक दिवसात चीनमध्ये ५० हजार लोकांना रोजगार मिळतो तर आपल्याकडे ४५० तरुणांना रोजगार मिळतो. आपल्याकडे लहान दुकानदारांपासून रोजगार मिळेल. मध्यम व्यवसाय व शेताजवळ फूड प्रोसेसिंग युनिट बसवल्याने रोजगार मिळेल. मोदी सर्व मदत केवळ १० ते १५ उद्योजकांना करतात, असा टोला त्यांनी लगावला.

गुजरात मॉडेलवर टीका
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेल कसे आहे? पैसे असतील तर नोकरी मिळेल, पैसा असेल तर जमीन मिळेल, अारोग्यसुविधा मिळतील. पैसे नसतील तर तुम्ही (जनता) खड्ड्यात जा. मोदींचे गुजरात मॉडेल फेल गेले आहे. आम्ही लहानसहान कामेही तुम्हाला विचारून करू, असे आश्वासन देतानाच ते म्हणाले, गुजरातच्या लोकांना गुजरात मॉडेलची कल्पना आली आहे. अनेक वर्षांपूर्वी आणखी एक गुजरात मॉडेल होते. त्याने धवल क्रांती आणली. शेतकऱ्यांना बळकटी दिली. आम्ही पुन्हा तेच मॉडेल आणू.

सौराष्ट्रात बैलगाडी मिरवणूक आणि चाय पे चर्चा :
२६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पहिल्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. व्हिजिटर्स बुकमध्ये वडील राजीव गांधी व आजी इंदिराजी यांचे संदेश वाचून ते भावुक झाले. सौराष्ट्रातील एका गावात ते बैलगाडीतून गेेले होते. तेथे चाय पे चर्चा झाली.

‘राम रहिम’ मग दंड कसा भरणार ?’

नवी दिल्ली :  बलात्कारप्रकरणी दोषी असलेला राम रहिम गुरमित २० वर्षे तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्याला कोर्टातर्फे दंडही सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी गुरमितच्या वकिलांनी पंजाब हरियाणा हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.

पंचकुला न्यायालयाने राम रहीम याला दोषी ठरवले होते आणि त्याच्यावर दंड ठोठावला होता. सोमवारी सुनावणीच्या वेळी डेरा प्रमुखाचा अॅड. एस. के. गर्ग नरवाना यांनी सांगितले की, सीबीआय न्यायालयाने डेरा प्रमुखाविरोधात ३० लाख २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

राम रहिमच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, राम रहिमने संसारीक विषयांचा त्याग केला आहे. मग एवढी रक्कम कशी भरणार ? त्यावर, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधीर मित्तल यांच्या खंडपीठाने राम रहीम यांच्या वकिलाला दोन महिन्यांच्या आत ३० लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला. न्यायालयाने सांगितले की, “डेरा प्रमुखांची काही मालमत्ता आणि बँक खाती आहेत, त्यातून दंड भरला जाऊ शकतो.” बाबाचा निधी साध्वींना तूर्तास देण्यास बंदी घालत  दोन महिन्यांच्या आत दंडाची रक्कम सीबीआय न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. दंडाची ही रक्कम कोणत्याही सरकारी बॅंकेत एफडी करण्यास सांगितले गेले आहे.

जर राम रहिमची अपील स्वीकारली तर ती रक्कम त्याला परत केली जाईल परंतु जर राम रहीमची अपील फेटाळली तर ती रक्कम साध्वींना दिली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान सीबीआयतर्फे यावर आक्षेपही घेण्यात आला. साध्वींचे वकीलही त्यास विरोध करत होते. पंचकूला विशेष सीबीआय न्यायालयाने दोन साध्विंच्या लैंगिक शोषणासाठी गुरुमीत राम रहीम याला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदीची शक्यता!

मुंबई : राजधानी दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाके विक्रीला बंदी येते का, हे पाहणं महत्वाचं आहे. मंत्रालयात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली, त्यावेळी रामदास कदम बोलत होते.

मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ देण्यात आली.

दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी

राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यावर्षी १२  सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश १ नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.

अभिनेत्री रेखाचा ६३ वा वाढदिवस

मुंबई : भानुरेखा गणेशन अर्थात बॉलिवूडची चिरतरुण अभिनेत्री रेखाने आज वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. बॉलिवूड कारकीर्दीत वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखाचं नाव येतं.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची कायमच चर्चा असायची. मात्र 1990 साली रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला. पण लग्नाच्या एका वर्षाच्या आतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं.

रेखाने अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केल्याचंही बोललं जायचं. मात्र रेखाने या वृत्तांचं खंडण करत चर्चांना पूर्ण विराम दिला. पतीच्या निधनानंतरही सिंदूर लावल्याने रेखा नेहमी चर्चेत असायची.

वडिलांच्या अंत्यसंस्काराला रेखा गेली नाही

रेखा ही दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावली यांची मुलगी आहे. रेखाचा जन्म झाला तेव्हा जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांचा विवाह झाला नव्हता, असं बोललं जातं. रेखाचं बालपण संघर्षमय आहे. कारण जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाची पर्वा केली नाही, किंवा तिला स्वतःचं नावही दिलं नाही.

जेमिनी गणेशन यांनी चार लग्न केले. मात्र रेखाच्या आईशी म्हणजे पुष्पावलीशी कधीही लग्न केलं नाही. रेखाला वडिलांचा एवढा तिरस्कार होता की, ती त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही.

बॉलिवूडमधील अधुरं स्वप्न

रेखाने बॉलिवूड कारकीर्दीत अनेक भूमिकांना न्याय दिला. आर्थिक परिस्थितीने रेखाला तेलगूतील ब आणि क श्रेणीतील सिनेमांमध्येही काम करण्यास भाग पाडलं. मात्र गेल्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रेखाचं एक स्वप्न अधुरं राहिलं. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याचं रेखाचं स्वप्न होतं.

दादर स्टेशनवर महिलेची प्रसुती

मुंबई : रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसुती झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता महिलेने मुलीला जन्म दिला.

सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. दादर स्टेशनवर असेलल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर प्रज्वलित आणि महिला जीआरपी यांच्या मदतीने सलमा यांची प्रसुती करण्यात आली.

रेल्वे स्टेशनवरच सलमा यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यानंतर इतर प्रवाशांनी मदतीसाठी जीआरपी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आई आणि बाळ सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसुती होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी घाटकोपर स्टेशनवरही महिलेने बाळाला जन्म दिला होता, असं वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.

चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : काही प्रमाणात दांडी मारत का असेना पण, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. अगदी परतीच्या पावसानेही आपली कामगिरी उल्लेखनीय केली. सध्याही राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधीही हवामान खात्याने असाच इशारा देताना ५ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने येत्या ४ दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसू शकतो असे म्हटले आहे.

दरम्यान, अलिकडील काळात हवामान खात्याच्या कामात प्रचंड सुधारणा झाली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजही बऱ्यापैकी खरे ठरताना दिसत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेले दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. पावसाची ही बरसात पुढील काही दिवस अशीच सुरू राहील असा हवामान खात्याचा व्होरा आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे त्याचा शेतीसाठी फायदाच होणार आहे. कारण अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाने पाठच फिरवल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील धरणे ओसंडून वाहात आहेत. काही वाहन्याच्या मार्गावर आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पावासाचा कहर पहायला मिळत आहे. अनेक ठिकामी वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर, काही ठिकाणी इमारती कोसळणे, इमारतींचे छप्पर उडणे, झाडे उन्मळणे असे प्रकार घडले आहेत. या पावसाचा मुक्या जनावरांनाही त्रास झाला आहे. तर, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अजित पवार यांना दिलासा

मुंबई : बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत याप्रकरणाची चौकशी थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने सोमवारी जारी केले आहेत.

महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्यासह बँकेच्या इतर वरिष्ठ पदाधिकारी यांची चौकशी करण्यात येणार होती. मात्र, २२ नोव्हेंबरपर्यंत चौकशी करु नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पवारांसह अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सहकारी बँकांमधील शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र बँक. गेल्या काही वर्षांच्या काळात ही बँक सतत तोट्यात आहे. कारण कर्ज वाटप करताना मोठी खैरात करण्यात आली. तब्बल दीड हजार कोटीचे कर्ज वाटप आहे. यासंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँकेवरील संचालक महामंडळ बरखास्त करत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशांना याच प्रकरणातील एक आरोपी माधवराव पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतरांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

मुंबई– मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवरून थेट समुद्रात उडी मारून एका ३० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने लघुशंकेचे कारण सांगून टॅक्सीचालकाला गाडी थांबवायला सांगितली व काही कळायच्या आतच त्याने सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या केली.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने हाजी अली येथून टॅक्सी पकडली व लीलावतीला जाण्यास सांगितले. या दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंकवरून टॅक्सी जात असताना त्याने चालकाला गाडी थांबवायला सांगितली. मात्र, चालकाने नकार दिला कारण तेथे गाडी थांबविल्यास पोलिस कारवाई करतात. मात्र, संबंधित व्यक्तीने मला मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे चालकाने गाडी थांबविली.

टॅक्सी थांबताच तो व्यक्ती बाहेर आला व काही कळायच्या आतच थेट सी लिंकवरून उडी मारली. यानंतर टॅक्सीचालकाने पोलिसांना याची माहिती कळविली. पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.