उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशच्या खुर्जा क्षेत्रात एक वेगळीच घटना समोर आली आहे. वर्गात मिशीवर ताव मारणा-या एका विद्यार्थ्याची शिक्षकाने मिशा कापल्याची ही घटना आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून या घटनेला सांप्रदायिक रंग दिला जात आहे.
विद्यार्थ्याच्या मिशा कापल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाने शिक्षकाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनुसार, ज्या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडली तो खुर्जा येथील शिवम टेक्नीकल कॉलेजमध्ये बी. फार्माचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता, त्यामुळे संबंधित शिक्षक नाराज झाले आणि त्यांनी विद्यार्थ्याची थेट मिशी कापून टाकली अशी माहिती एका सहकारी विद्यार्थ्याने दिली. jansatta.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे या घटनेला सांप्रदायिक रंग मिळाला आहे.. पोलिसांनी घटनेची चौकशी करून कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं आहे.