Saturday, May 4, 2024
Homeदेशया देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संतप्त सवाल

या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संतप्त सवाल

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक कार्यकर्त्यांची घेतली शेतकऱ्यांची भेट

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला हवा देण्यासाठीच शिवसेना खासदार शेतकऱ्यांना भेटल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

टिकैत यांना अश्रू अनावर

शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.

‘संजय राऊत, कोरोना नाही’

या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. राऊत आणि त्यांचे सहकारी तोंडाला मास्क लावून आंदोलनस्थळी आले. यावेळी महिलांनी एकच गोंधळ घातला. संजय राऊत कोरोना नाही. तोंडाचे मास्क काढा. या सरकारला तुम्हीही बहकला का?, असा सवाल या महिला करत होत्या.

अहंकाराने देश चालत नाही: राऊत

यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही. राजकारणही चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments