Tuesday, April 30, 2024
Homeदेशराहुल गांधी यांचा काश्मीरमुद्द्यावरून युटर्न

राहुल गांधी यांचा काश्मीरमुद्द्यावरून युटर्न

राहुल गांधींनी पाकिस्तानला काश्मीर प्रकरणात नाक खुपसण्याचा अधिकार नाही असं म्हटलं

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमुद्द्यावरून युटर्न घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानला यावरून खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी राहुल गांधीच्या वक्तव्याचा आधार घेत पाकिस्तानने त्यांची बाजू मांडली होती. दरम्यान, आता राहुल गांधींनी पाकिस्तानला काश्मीर प्रकरणात नाक खुपसण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे.

पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघाला पाठवलेल्या चिठ्ठीनंतर राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, मी या सरकारच्या अनेक मतांशी असहमत आहे. मात्र, काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे यामध्ये पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशांनी हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.

राहुल गांधी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे कारण पाकिस्तान हिंसाचाराला खतपाणी घालत आहे. जगभरात पाकिस्तानची ओळख दहशतवादाचं समर्थन करणारा देश आहे.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाला चिठ्ठी लिहली होती. त्यामध्ये भारतानं हिंसा केल्याचा आणि मानवाधिकाराचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने हा दावा करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेतला होता. याशिवाय जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याही नावाचा उल्लेख पाकिस्तानने पत्रात केला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, काश्मीरमध्ये चुकीचं घडत आहे आणि लोक मारले जात आहेत.

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला जी 7 शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानसोबतचे जे मुद्दे आहेत ते सर्व द्विपक्षीय आहेत. यामध्ये तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं मोदी म्हणाले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अमेरिका दौऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्यानंतर इमरान खान यांचा दावा फोल ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments