Tuesday, May 7, 2024
Homeदेशनागरिकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले

नागरिकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

पंतप्रधान म्हणाले, “शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे.”

दरम्यान, दिल्लीतील परिस्थितीवरुन आता राजकारणही सुरु झालं असून काँग्रेस आणि भाजपाने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दिल्लीतील परिस्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तर काँग्रेसचीच ही खेळी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

तसेच दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी NSA कडे देण्यात आली आहे. दिल्लीत काय परिस्थिती आहे याची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत. मंगळवारी रात्री डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments