नवी दिल्ली: देशामधील तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणास आजपासून सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी ७ वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर त्याबद्दलची माहिती समोर आली. या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. तर, मोदींनी लस घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका वेगळ्या मुद्य्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
Prime Minister Narendra Modi, day in an day out drums Hindu loyalty but does not believe in Hindu nurses, hence took the vaccine jab from Christian nurse, what a behaviour
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 1, 2021
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, दररोज हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात पण हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही, म्हणून ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली, काय वागणं आहे.” असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव पी. निवेदा असुन, त्या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच, पी. निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या परिचारिकेचं नाव रोसामा अनिल असुन त्या केरळच्या असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून मोदींना लस देणाऱ्या दोन्ही परिचारिकांनी डीडी न्यूजला मोदींना दिलेल्या लसीसंदर्भातील माहिती दिली आहे.
“मागील तीन वर्षांपासून मी एम्समध्ये काम करत आहे. सध्या मी करोना लसीकरण केंद्रात कार्यरत आहेत. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
पीएम सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आलं तेव्हा ते लस घेण्यासाठी पोहचल्याचं समजलं,” असं निवेदा यांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “सरांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस देण्यात आली असून पुढील डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे,” असंही पी. निवेदा म्हणाल्या.
मोदींनी काय विचारलं असा प्रश्न या परिचारिकांना विचारण्यात आला. त्यावर “तुम्ही मुळच्या कुठून आहात वगैरे चौकशी पंतप्रधानांनी केली. तसेच करोनाची लस दिल्यानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना, दिली सुद्धा लस कळलंही नाही, (लगा भी दिये, पता भी नही चला) असं म्हटलं,” अशी माहिती पी. निवेदा यांनी दिली.