आसाम: पत्नीसोबत आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या त्याच पत्नीवर पतीने लग्नाच्या २४ तासानंतर आपल्या मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. हुंडा दिला नाही या एकमेव कारणामुळे पतीने आपल्या पत्नीवर बलात्कार केला. आसाममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
१७ एप्रिल रोजी आरोपी पतीने आपल्या मित्रांसोबत मिळून पत्नीचा सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दोघांनाही पाहताक्षणी अटक करण्याचा आदेश दिला आहे. पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने हुंडा म्हणून सोन्यान्या दागिन्यांची मागणी केली होती. पण जेव्हा पत्नीच्या कुटुंबियांनी मागणी पूर्ण केली नाही तेव्हा त्याने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला.
कठुआ आणि उन्नाव बलात्कारानंतर १२ वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. मात्र आसाममध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा कमी होताना दिसत नाही. एका रिपोर्टनुसार, गेल्या दोन महिन्यात एकट्या आसाममध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची २० प्रकरणं समोर आली आहेत.