Monday, May 13, 2024
Homeदेशजिग्नेश मेवानींच्या पुण्यातील ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू आघाडीचा विरोध

जिग्नेश मेवानींच्या पुण्यातील ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू आघाडीचा विरोध

पुणे: भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत ३१ डिसेंबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर होणाऱ्या एल्गार परिषदेला गुतरामधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी उपस्थिती लावणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी विरोध दर्शविला आहे. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांना निवेदनही दिले आहे.

भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत ३१ डिसेंबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर होणाऱ्या ‘एल्गार परिषदे’ला सर्वोच्च न्यायालयालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, अॅड. प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार जिग्नेश मेवानी, राधिका वेमुला (रोहित वेमूलाची आई), उमर खालिद, उल्का महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहरी हे उपस्थित राहणार आहेत. हा नियोजित कार्यक्रम चार दिवसांवर येऊन ठेपला असताना या कार्यक्रमास गुजरातमधील दलित समाजाचे तरुण नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी येणार आहेत. गुजरातमध्ये तडाखेबाज भाषणं करणारे मेवानी या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, या एल्गार परिषदेस समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी विरोध दर्शविला असून शनिवारवाड्यावर नियमानुसार सांस्कृतिक कार्यक्रम होणे अपेक्षित असताना हा राजकीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी राजकीय वक्तव्ये होणार हे निश्चित आहे. त्यामुळे महापालिकेने या परिषदेला परवानगी देता कामा नये, अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे. तसेच जर कार्यक्रम घेतल्यास त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. समस्त हिंदू आघाडी परिषदेने विरोध केल्याने जिग्नेश मेवानी यांचा कार्यक्रम होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments