Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेश'बम बम भोले'च्या जयघोषात दुमदुमली १२ ज्योतिर्लिंग

‘बम बम भोले’च्या जयघोषात दुमदुमली १२ ज्योतिर्लिंग

मुंबई : आज सगळीकडे महाशिवरात्री निमित्त शिवमंदीरात भाविकांनी गर्दी केली आहे. अंबरनाथ शहरातील ९५८ वर्ष अशा अतिप्राचीन शिवमंदिरातही रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांची मोठी गर्द्दी पाहायला मिळतेय. महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी जत्रा भरते. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुम्बानी यानं ९५८ वर्षा पूर्वी बांधल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे युनोस्कोनं जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे.

मध्यरात्री १२ वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता अंबरनाथ पालिकेने भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केली आहे.

तर मुंबईतही महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळाला. मुंबईतल्या बाबूलनाथ या प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईतलं हे अत्यंत प्राचीन आणि उंच शिवमंदिर आहे. इथल्या टेकडीवर बाभळीचे झाड होते आणि त्यावरून बाबूलनाथ असं नाव पडलं. अशी आख्यायिका आहे. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. असं सांगितलं जातं.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाचं महाशिवरात्री निमित्ताने दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. या वर्षी गारपीटीचा फटका या यात्रेला बसला असून लाखोच्या संख्येनं येणारे भाविक यंदा मात्र हजारोंच्या संख्येत आहेत. महाशिवरात्रीत मध्य रात्री भगवान शंकराची विधीवत पुजा करून भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून तर भाविक येतातच परंतु आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकराच्या मंदिरातही भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली होती. या ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातलं घृष्णेश्वराचं मंदिर हेही १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळ हे अतिप्राचीन मंदिर आहे. इथंही पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला असं मानलं जातं. त्यानंतर १७ व्या शतकात अहिल्याबाईंनी परत या मंदिराचा जीर्णोद्धार केला. लाल रंगाच्या दगडात हे मंदिर बांधलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments