Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र'अर्णव गोस्वामीच्या देशद्रोहावर चर्चा झाली तर पुलवामातील शहिदांचा आत्मा शांत होईल'

‘अर्णव गोस्वामीच्या देशद्रोहावर चर्चा झाली तर पुलवामातील शहिदांचा आत्मा शांत होईल’

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचा मालक, संपादक अर्णव गोस्वामी याच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक वादग्रस्त व संवेदनशील गोष्टी पुढं आल्यानंतर विरोधक अत्यंत आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर शिवसेनेनं आज भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अर्णव गोस्वामीनं पुलवामातील ४० जवानांच्या हत्येवर आनंद व्यक्त करणं हा देश, देव आणि धर्माचाच अपमान आहे. देशद्रोह आहे. या देशद्रोहाविरोधात भाजप ‘तांडव का करत नाही,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

हिंदू देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजपनं ‘तांडव’ नामक वेबसीरिजला विरोध केला आहे. ‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले आहेत. त्याचवेळी अर्णब गोस्वामीच्या वादग्रस्त चॅटवर भाजपनं अद्याप कुठलीही भूमिका मांडलेली नाही. नेमकी हीच संधी साधून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार आसूड ओढले आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील मीडियावरही शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे. ‘शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे.

स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा आणि हे राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार. हे लोक स्वतःला राष्ट्राचा चौथा स्तंभ समजतात. मग त्यांच्यातल्याच एका वाळवी किड्याने देशाचा स्तंभ पोखरला, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली गुपिते फोडली, त्याने देशद्रोहच केला तरी ‘मीडिया’ थंड का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे प्रकरणांवर चोवीस तास वखवखणाऱ्यांना अर्णबच्या देशद्रोही कृत्याचा साधा संताप येऊ नये याचे दुःख वाटते,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

<< हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भाजपनं जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण ‘तांडव’विरोधात उभा ठाकलेला भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुपिते गोस्वामीने फोडली. यावर भाजप तांडव का करीत नाही? चीनने लडाखमध्ये घुसून भारताच्या जमिनीचा ताबा घेतला, यावर ‘तांडव’ का होत नाही?

<< हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा जितका घोर अपमान गोस्वामीने केलाय, तितका पाकिस्ताननेही केला नसेल. ‘पुलवामा’तील आमच्या सैनिकांची हत्या हा देशांतर्गत राजकीय कट होता असे आरोप त्यावेळी झाले होते. आता अर्णब गोस्वामीच्या व्हॉट्सअॅपवरील जे काही संभाषण बाहेर आले आहे, ते या आरोपांना बळकटी देणारेच आहे.

<< गोस्वामीला गोपनीय माहिती पुरवून राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करणारे नक्की कोण होते, हे सत्य सरकारने पुढे आणायला हवे. ‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द.

<< हिंदुत्व आणि भारतमातेचा अपमान फक्त ‘तांडव’पुरताच मर्यादित नाही. मोदी हे भगवान विष्णूंचे तेरावे अवतार आहेत, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगणे हा सुद्धा हिंदुत्वाचा अपमानच आहे.

<< ‘तांडव’मधील कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे व तो का आहे यावर चर्चा व्हायला हरकत नाही, पण अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. पुलवामा हल्ल्यासंदर्भातील अर्णबचा संवाद हा पाकड्यांच्या सोयीचाच आहे व इम्रान खान यांनी त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी हे भलतेच साटेलोटे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments