महत्वाचे….
१. शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या प्रकरणी आमदार जगताप यांच्यासह तीस जणांविरोधात गुन्हा दाखल
२. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी पहाटे अटक
३. अहमदनगरमध्ये तणाव, तोडफोड, जाळपोळ
अहमदनगर: अहमदनगरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणातील हल्लेखोर संदीप गुंजाळ हा देखील शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला असून तो काँग्रेसमध्ये सक्रीय होता, अशी चर्चा सुरु आहे.
शनिवारी केडगाव उपनगरातील भररस्त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. संजय कोतकर (वय ५५) आणि वसंत ठुबे (वय ४०) अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. संजय कोतकर हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. केडगावमधील महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ही घटना घडल्याने नगरमधील वातावरण तापले.
पोलिसांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर (वय २५) याने या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. रविवारी पहाटे पोलिसांनी संग्राम जगताप यांना अटक केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.