Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

wardha-hinganghat-burn-case-victims-death
वर्धा : हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.

नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात गेल्या ७ दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. या सात दिवसांमध्ये तिच्यावर दोन ते तीन वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. सुरू असलेल्या औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. रक्तदाब तसंच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत घोषित केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छ‌वास प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. परंतु पीडितेच्या वडिलांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

‘त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा – पीडितेचे वडिल

‘आमच्या मुलीला जो त्रास झाला तो त्या नराधमालाही व्हायला हवा. माझ्या मुलीला तातडीने न्याय मिळाला पाहिजे. त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.

ही घटना नसून हा खून आहे – सुप्रिया सुळे

“अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून अशा घटना राज्यात होणं हे अतिशय दु:खद आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. ही घटना नसून हा खून आहे आणि आरोपी नराधमावर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.”

आरोपीला न्यायालयीन कोठडी

हिंगणघाट येथे प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळल्याच्या घटनेतील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला शनिवारी पहाटे हिंगणघाट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी वर्धा जिल्हा कारागृहात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments