Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यापंकजा मुंडेंचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दबावतंत्र

पंकजा मुंडेंचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दबावतंत्र

मुंबई: राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरुनही भाजपचा नामोनिशाणा मिटविला. पंकजा मुंडे विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपवर दबावतंत्र आणत आहेत. यासाठी त्यांची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पंकजा मुंडेचा पराभव झाल्यामुळे आता विधान परिषदेत संधी मिळावी व विरोधी पक्षनेतपदाची संधी मिळावी यासाठी सर्व खेळी खेळली जात आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपवर दबाव आणण्यासाठी ही खेळी असून, पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा त्यांच्या पोस्टवर सुरु झाली आहे. मात्र, ही पोस्ट टाकून पदरात पाडून घेण्यासाठी पक्षासमोर अडचण आणण्याची ही खेळी आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुध्दा दोन वेळा पक्षाविरोधात बंड पुकारला होता. मात्र, त्यांची समजूत काढण्यात आली होती.

“पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” असं पंकजा मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

एकीकडे ही फेसबुक पोस्ट तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे.

पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनतेप्रती असलेल्या जवाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…

आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपणभाजप नेत्या पंकजा मुंडे काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !! येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!! असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी जनतेला केलं आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला पंकजा मुंडे नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments