Friday, May 10, 2024
Homeविदर्भवर्धासमाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचल्या - राज्यमंत्री अतुल सावे

समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचल्या – राज्यमंत्री अतुल सावे

वर्धा : पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी वर्षानुवर्षे शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासन विस्तारीत समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत योजनेची माहिती देत आहे. नागरिकांना एकाच दिवशी विविध योजनेचे दाखले देण्यात येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे प्रतिपादन उद्योग, खनीकर्म व अल्पसंख्याक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले.

आज विकास भवन येथे जिल्हा प्रशासनाचे वतीने आयोजित समाधान शिबिराचे आयोजन केले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार पंकज भोयर, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, नियोजन समिती सदस्य जयंत कावळे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, जि.प. सभापती जयश्री गफाट आदी उपस्थित होते.

देशात महाराष्ट्र उद्योग निर्मिती मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात गेल्या साडेचार वर्षात १९ नवीन उद्योग निर्माण करण्यात आले आहे. या उद्योगामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाने अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयाची तरतूद केली असून अल्पसंख्याकांना मोफत शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. सावे म्हणाले. प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. देशातील आतापर्यंत १० कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. यावेळी त्यांनी आमदार पंकज भोयर यांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या विकासाची प्रशंसा केली.

यावेळी प्रशांत इंगळे, जयश्री गफाट यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. आज झालेल्या समाधान शिबिरात जात प्रमाणपत्र, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, आपसी वाटणी, रस्त्याचे परवाणगी पत्र, आखीव पत्रिका, राष्ट्रीय कुंटूब लाभ योजना, फळबाग लागवड, राजश्री शाहू महाराज योजनेचा लाभ व प्रमाणपत्राचे 35 हजार लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले तर यावेळी मान्यवरांचे हस्ते प्राथमिक स्वरुपात 15 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम दिघे यांनी तर आभार प्रीती डूडूलवार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments