Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई विद्यापीठाचं काम ‘IIFCL’लाच देण्याचा आग्रह का? राज्यपालांच्या प्रस्तावावर युवासेनेचा सवाल

मुंबई विद्यापीठाचं काम ‘IIFCL’लाच देण्याचा आग्रह का? राज्यपालांच्या प्रस्तावावर युवासेनेचा सवाल

मुंबई : आयआयएफसीएल IIFCL कंपनीला काम देण्याच्या प्रस्तावावरुन सध्या मुंबई विद्यापीठात राज्यपाल विरुद्ध युवासेना संघर्ष पेटला आहे. कुलगुरुंनी हा प्रस्ताव पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला. मात्र युवासेना सिनेट सदस्यांसह अन्य सदस्यांच्या विरोधामुळे कंपनीला काम देण्याबाबत कुठलाही निर्णय सभेत होऊ शकला नाही. IIFCL कंपनीलाच काम देण्याचा आग्रह का? असा सवाल युवासेनेने केला आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या आज पार पडलेल्या बैठकीत कुलगुरुंनी आयआयएफसीएल कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी मांडला. विद्यापीठातील विकास कामांबाबत कंपनी सल्लागाराचे काम करणार, असा प्रस्ताव होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कंपनीला काम देण्याबाबत शिफारस केली होती.

राज्यपालांचा प्रस्ताव मागे घेण्याची कुलगुरुंवर नामुष्की

11 जानेवारीच्या बैठकीत युवासेनेसह अनेक सदस्यांनी आक्षेप घेतल्याने कुलगुरुंवर राज्यपालांचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. तरीही आज कुलगुरूंनी हा प्रस्ताव पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला.

कुलगुरुंनी IIFCL कंपनीबाबत सादरीकरण केले. पण कंपनीच्या कामाचे स्वरुप, किती मोबदला. याबाबत कुठलीही स्पष्टता नव्हती. तसंच कंपनीला यापूर्वी विद्यापीठाच्या कामाचा अनुभव नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे युवासेना सिनेट सदस्यांसह अन्य सदस्यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली.

“IIFCL लाच काम देण्याचा आग्रह का?”

कामासाठी आदर्श निविदा प्रक्रिया स्वीकारण्यात यावी. त्यात राज्यपालांनी शिफारस केलेली कंपनीही सहभागी होऊ शकते, असा मुद्दा व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनी मांडला. आणखी नावाजलेल्या कंपन्या असताना IIFCL कंपनीलाच काम देण्याचा आग्रह का केला जातोय? हा मुद्दाही सदस्यांनी मांडला.

कंपनीला काम देण्याबाबत कुठलाही निर्णय सभेत होऊ शकला नाही. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना कुलगुरु राज्यपालांना कळवणार आहेत. आधीच राज्यपाल नामनिर्देशत 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या तणाव आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टेनिस कोर्टात गुरं चरायला

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील मोकळ्या जागेत गुरं चारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानात टेनिस कोर्ट असेलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग होत नसल्यामुळे या ठिकाणी गुराखी गुरांना घेऊन येत असल्याचं उघड झालं होतं. युवासेनेच्या सिनेट (senate) सदस्यांनी या जागेची पाहाणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments