करणच्या नजरेत एसएस सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक !

मुंबई : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना त्यांच्या ४४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच एसएस राजामौली हे भारतीय सिनेमाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, असे करणने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

करणने ट्विटमध्ये म्हटले आहे, “भारतीय सिनेमाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एसएस राजामौली यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. दिग्गज कथाकार आणि उत्तम दृष्टिकोन.”

राजामौली यांनी दिग्दर्शन केलेला बाहुबली सिनेमाने अनेक रेकॉर्डस् बनवले. यात प्रभास, राणा दग्गूबाती, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन आणि सत्याराज हे कलाकार आहेत.

कीटकनाशक प्रकरण: दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा:

मुंबई: कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमधील दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महत्त्वाची घोषणा केली. कीटकनाशक फवारणीत दोषी कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय १० हजार शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

सनी लिओनीची नवीन कार पाहिली का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.

सनीकडे याच कंपनीची आणखी एक कार होती. ती कार तिने २०१४ साली पती डेनियल वेबरला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली होती. सनीनं ही कार अमेरिकेतून खरेदी केली आहे. सनी लिओनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे.

सनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिच्या नव्या प्रॉडक्शन हाऊसच्या लॉंचिंगसाठी गेली आहे. तिथे तिने एक नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच तिने एकता कपूरच्या वेब सीरिजच्या प्रमोशन कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. याकारणाने एकता कपूर नाराज झाली आहे.

गोव्यातील कॅसिनो हे पर्रीकर सरकारचे एटीएम, काँग्रेसची टीका

पणजी : गोव्यातील मांडवी नदीतील कॅसिनो म्हणजे पर्रीकर सरकारसाठी एटीएम आहे, दरवेळी सरकार कॅसिनोना मांडवीबाहेर पाठवणार असे जाहीर करते आणि मग गुपचूप मुदतवाढ देते. गोमंतकीयांना फसवण्याची ही नाटके सरकारने बंद करावे असा आरोप चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला.

सरकार कॅसिनोंकडून पैसे घेते आणि मुदतवाढ देते. कॅसिनो जुगार गोव्यातून हद्दपार करा अशी आमची मागणी आहे. कारण कॅसिनो गोमंतकीयांना उध्वस्त करत आहे, असे चोडणकर म्हणाले. कॅसिनोंमध्ये रोज लाखो रुपयांची रोख रक्कम वापरून उलाढाल केली जाते. प्राप्तीकर कायदे सामान्य माणसाची अडचण करण्यासाठी बदलणार्‍या केंद्र सरकारने या उलाढालीकडे लक्ष द्यावे असे चोडणकर म्हणाले.

मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे करमणूक झोन तयार करून सरकार कॅसिनो जुगारास मोपा येथे नेऊ पाहत आहे. सरकारने मोपा परिसरातील लोकांशी त्याविषयी चर्चा केली आहे काय अशी विचारणा चोडणकर यांनी केली.

फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरे

मुंबई: फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील फटाकेबंदीवर आपलं मत मांडलं. फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच असेही त्यांनी यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं.  नवी दिल्लीपाठोपाठ मुंबईतही फटाके विक्रीचे परवाने रद्द करण्याचे आदेश मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. निवासी भागातील फटाके विक्रीवर न्यायालयानं बंदी घातली असून, आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाई करू, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

फटाक्यांवरुन ‘राजकीय धूर’ पसरला!

दिल्ली पाठोपाठ राज्यातही फटाके विक्री बंदीची चर्चा सुरु असतांना, मंगळवारी राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाके विक्रिला परवानगी देऊ नका असे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले. यावरुन चांगलेच राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली. सरकारचा प्रदषूण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा उद्देश चांगला जरी असला तरी त्याला अंतर्गत विरोध वाढणार आहे. मंगळवारी उच्चन्यायालयाने सांगितले की,फटाके विक्रीचे जे परवाने दिले आहेत त्यांची संख्याही अर्ध्यावर आणा. या निर्णयावरुन शिवसेना आक्रमक झाली. रोजगार देऊ शकत नाही तर रोजगार हिरावून का घेता? फटाके बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वर्षोनुवर्ष साजरे होणारे सर्व कायम स्वरुपी बंद करा. सर्व सणांच्या सुट्याही रद्द करा. तसेच आता फटाकेही व्हाटसअपवर फोडायचे का अशी टीका केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली. दिल्लीत ११ नोव्हेंबर २०१६ पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला. फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना मंगळवारी निवासी भागात फटाके विक्रिला बंदी घातली. खरतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय चांगला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी असे विधान केले होते. कारण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल, हा त्यांचा उद्देश आहे. मंगळवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७’ आयोजन करण्यात आले. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीची प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार अशी शपथ घेतली.  न्यायालयाच्या तसेच मुख्यमंत्री,पर्यावरण मंत्र्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याला धर्माशी आणि रोजगाराशी जोडणे चुकीचेच आहे. चेतन भगत यांनी सुध्दा मंगळवारी याला मोहर्रम शी जोडले. खरतर मोहर्रम आणि फटाक्यांचा काहीही संबंध नाही. चुकीची माहिती आणि स्वस्तात प्रसिध्दीसाठी कुणी करत असेल तर त्यामध्ये त्यांचा अज्ञान दिसून येतो. महागाईच्या झळा सोसत असतांना आता फटक्यांवरुन अंतर्गत राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. तसेच राज्यातील देशातील मुळ जे प्रश्न आहेत त्यांच्यापासून आपण भरकटत आहोत हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मात्र दिवाळी पर्यंत फटक्यांवरुन राजकीय धूर पसरलेला असेल आणि आरोप प्रत्यारोप बघायला मिळेल.

उरणमध्ये पडला काळा पाऊस

उरण : उरणमध्ये शनिवारी आणि रविवारी काळा पाऊस पडला. पावसाचं हे पाणी प्रदूषित असल्याचं उरणवासियांचं म्हणणं आहे. या आधी कधीही असा पाऊस या ठिकाणी पडला नाही.

स्थानिकांनी  दिलेल्या माहितीनुसार, पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर काही काळ हा काळा पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाचं चांगले पाणी पडण्यास सुरुवात झाली. उरणजवळ असलेल्या बुचर आयलंडमधील तेलाच्या टाकीला लागलेल्या भीषण आगींनतर पडलेला हा पाऊस काळा पडला. यामुळे आगीमुळे दूषित झालेले धूलिकण पावसाबरोबर खाली आले. यामुळे हा पाऊस काळा पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. या पाण्याची तपासणी करण्याची मागणी आता उरणवासीयांनी केली आहे.

दरम्यान, शहरांतील नागरिकरण, झपाट्यान वाढत असलेल्या औद्योगीक वसाहती, वाहनांची गर्दी या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील अनेक कारखान्यांचे सांडपाणी नदी, नाले, समुद्रात सोडले जात आहे. तर, याच कारखान्यांमधून बाहेर फेकला जाणारा धूर हा आकाशात मिसळला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारखाण्यांच्या चिमन्या हव्या त्या प्रमाणात उंचींवर नसतात. त्यामुळे कारखान्यांचा धुर जमिनीलगतच्या पर्यावरणात पसरतो. परिणामी नागरिकांना त्याचा त्रास होतो.

उरणमध्ये पडलेला काळा पाऊसही वाढते नागरिकरण आणि औद्योगीक वसाहतींमधून बाहेर पडणारा धुर यांचाच परिणाम असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

राज्यात निवासी भागात फटाके विक्रीला बंदी

मुंबई: राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाके विक्रिला परवानगी देऊ नका असे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला निर्देश दिले. जे परवाने दिले आहेत त्यांची संख्याही अर्ध्यावर आणा असेही आदेशात म्हटले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली होती. दिल्लीत ११ नोव्हेंबर २०१६ पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केले. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७’ आयोजन करण्यात आले. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीची प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबवले.

मुख्यमंत्र्यांनी दिली ‘प्रदुषणमुक्त दिवाळी’ची शपथ

मुंबई : राज्यात प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. यावेळी पहिल्यांदाच राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी संकल्प अभियानाची शपथ देण्यात आली.

राज्य सरकारचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रदुषणमुक्त दिवाळीचा उपक्रम राबवण्यात आला. फटाक्यांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

राहुल गांधी हिच्यामुळेच सध्या ट्रेंड होतायत

नवी दिल्ली : सध्या राहुल गांधी गुजरात दौर्यावर आहेत आणि त्यांची वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात हिट होत आहेत. खास करून ट्विटरवर त्यांची स्टेटमेंट ट्रेंड होताना दिसत आहेत. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसची डिजिटल टीम अतिशय सक्रियपणे झाली आहे.

राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या गुजरात भेटीदरम्यान,कॉंग्रेस सोशल मीडिया टीमने केंद्र सरकारच्या विरोधात ‘विकास पगल हो गया’ मोहिम सुरू केली. ज्यानंतर राहुल यांचे वक्तव्य प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून ते चर्चेचा विषय बनले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर राहुल .यांच्या वक्तव्यांना ट्रेड करणाऱ्या टीम आणि मास्टरमाईंडचे नाव विचारले जात आहे.

या सर्वामागे दिव्या स्पंदन उर्फ राम्या हिचा हात आहे. नुकतेच पक्षाच्या सोशल मिडिया टीममध्ये बदल करण्यात आले. पक्षाने दिपेंद्र हुडा आणि अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे.

राम्याच्या सोशल मीडिया टीममध्ये ८५ टक्के महिला आहेत. जेव्हा राम्या ने या टीमची ताबा घेतला तेव्हा पार्टीच्या डिजिटल वॉर रूममध्ये केवळ तीन महिला होत्या. यानंतर, तिने आपल्या टीममध्ये अनेक प्रोफेशनल्सची भरती केली आणि सेलची ताकद दुप्पट केली. यामूळे सोशल मीडियावर कॉंग्रेस पक्षाची सक्रियता वाढलेली दिसत आहे.

कोण आहे दिव्या ?

दिव्या दक्षिण भारतात राम्या नावाने प्रसिद्ध आहे. ती एक कन्नड अभिनेत्री आहे. दिव्याचा जन्म २९ नोव्हेंबर १९८२ बेंगळुरू येथे झाला. दिव्याने २००३ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१२ मध्ये तिने कॉंग्रेस जॉईन केले होते.
दिव्याची आई काँग्रेस पक्षाची दिग्गज नेता आहे, तर तिचे वडील एक व्यवसायिक आहेत. त्या २०१३ मध्ये कर्नाटकच्या मंड्या मतदारसंघातून लोकसभा पोटनिवडणुक जिंकून संसद सदस्य बनल्या होत्या. दरम्यान २०१४ मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. सध्या ती कॉंग्रेसचा सोशल मीडिया कम्युनिकेशन बघत आहेत.

कॉंग्रेसमध्ये काही नेत्यांना आधीच डिजिटल माध्यमांच्या शक्तीची जाणीव होती. पार्टीचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे एकमेव नेते ज्यांचे मे २००९ मध्ये ट्विटर अकाऊंट होते. त्यांचे 6 हजार फॉलोअर्स होते. सद्यस्थितीत, त्यांचे ६० लाख फॉलोअर्स आहेत, जे काँग्रेस नेत्यांमध्ये सर्वाधिक आहेत.