काबुल: ग्रेनेड फेकून हे तीन हल्लेखोर ‘शमशाद टीव्ही’च्या इमारतीत घुसले, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक ठार झाला आहे. २० जखमींवर उपचार सुरू असून कारवाई अजूनही सुरू आहे.
इमारतीचा परिसर पोलिसांनी सील केला असून कथित इस्लामिक स्टेटनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांच्याच ‘अमाक’ वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं आहे. हल्ला झाल्यानंतर ‘शमशाद’वरचं प्रसारण लगेच थांबवण्यात आलं होतं. आता ते पूर्ववत सुरू झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून काबुल हे तालिबान आणि कथित इस्लामिक स्टेटचं लक्ष्य ठरलं आहे. अफगाणिस्तान हा पत्रकारांसाठी सगळ्यांत धोकादायक देश असल्याचं अफगाण पत्रकार सुरक्षा समितीनं आपल्या अहवालात म्हटलं होतं. मे महिन्यात एका सुसाईड बाँम्ब हल्ल्यात काबुलमध्ये १५० जणांचा मृत्यू झाला होता. यात बीबीसीचा एक वाहनचालकही होता. तसंच गेल्या वर्षी, तालिबानने केलेल्या एका सुसाईड बाँम्ब हल्ल्यात खाजगी न्यूज चॅनलच्या सात जणांचा मृत्यू झाला होता.