Sunday, April 12, 2026
Homeसंपादकीयअग्रलेखपत्रकारिता—मनातून मशीनपर्यंतचा प्रवास

पत्रकारिता—मनातून मशीनपर्यंतचा प्रवास

आज मात्र सर्वकाही ChatGPT आणि AI टूल्सच्या हवाली झालं आहे. एका क्लिकवर लेख तयार, एका प्रॉम्प्टवर मथळा तयार. शब्द आता घडत नाहीत, ते निर्मित होतात — मशीनकडून.

journalist, journalism, patrakar, पत्रकारिता

जेव्हा मी पत्रकारितेत पहिले पाऊल टाकले, तेव्हा हा व्यवसाय नव्हता — ती साधना होती. प्रत्येक बातमी म्हणजे एक यज्ञ, प्रत्येक संपादकीय म्हणजे तपश्चर्या. त्या काळी लेखन फक्त शब्द नव्हते, ते विचारांचं, भावनांचं, आणि प्रामाणिकतेचं प्रतिबिंब होतं. आम्ही लिहायचो, पुन्हा लिहायचो, पुन्हा पुन्हा तपासायचो, आणि शेवटी संपादकाकडे गेल्यावरही शंभर प्रश्न तयार असायचे. “का लिहिलंस असं? दुसऱ्या शब्दात सांग ना!” — हाच होता आमचा गुरुकुल.

मी लहान असताना खाडिलकर, नवकळकर, खेबुडकर यांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांना मी अक्षरशः हाताने लिहिताना पाहिलं आहे. त्यांच्या पेनच्या टोकातून शाई नाही, तर विचार वाहायचे. त्या लेखनात आत्मा होता, आणि त्या आत्म्याचं नाव होतं पत्रकारिता.

माझ्या पिढीत संगणक आले. आम्हाला वाटलं — “काय सोपं झालं आयुष्य!” पण खरं सांगायचं तर, तंत्रज्ञानाने गती दिली, पण त्याने विचारांची खोली नाही वाढवली. आम्ही Google वापरू लागलो, माहिती मिळवू लागलो. पण मनात भीतीही होती — ही मदत चोरी ठरेल का? म्हणून वाचलेलं पुन्हा आपल्या भाषेत, आपल्या भावनेत लिहायचो. आणि तरीही संपादक पुन्हा एकदा पाहून म्हणायचे — “हे अजून तयार नाही.”

ADC मधले दिवस आजही आठवतात. एक सज्जन होते — सुरेश बालिगा. त्यांच्या हातून निघालेला प्रत्येक मथळा जणू जिवंत होत असे. आमचे संपादक मोबिन पंडित आम्हाला लेख दहा वेळा लिहायला लावायचे, जोपर्यंत तो शुद्ध, सुसंगत आणि प्रभावी होत नाही. FPJ मध्येही हाच संस्कार होता — “लेख म्हणजे अहंकार नव्हे, तो जबाबदारी आहे,” हे आम्हाला तिथे शिकवलं गेलं.

मी माझं स्वतःचं वृत्तपत्र सुरु केलं. कल्पना करा — बातम्या गोळा करणं, पुन्हा लिहिणं, प्रूफरीडिंग, सब-एडिटिंग, डिझाईन करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — एक मथळा देणं जो वाचकाच्या मनात झिरपेल. झोप उडायची, पण जेव्हा सकाळी ते वृत्तपत्र हातात घ्यायचे — ती भावना शब्दात मावणारी नव्हती. तो थकवा, ती घाई, तो घाम — सगळं सार्थक वाटायचं.

आज मात्र सर्वकाही ChatGPT आणि AI टूल्सच्या हवाली झालं आहे. एका क्लिकवर लेख तयार, एका प्रॉम्प्टवर मथळा तयार. शब्द आता घडत नाहीत, ते निर्मित होतात — मशीनकडून. विचारांच्या जागी अल्गोरिदम आले आहेत, आणि संवेदनांच्या जागी कोड.

AI लेखकाचा हात धरतो, पण त्याला विचार शिकवत नाही. तो लेख लिहून देतो, पण त्यातल्या आत्म्याला ओळखत नाही. मी हे स्वीकारते — काळ बदलला आहे. पण मनाच्या कोपऱ्यात एक वेदना आहे — इतकं सोपं झालं की, आता काहीही खरं वाटत नाही.

मी तीन पिढ्या पाहिल्या आहेत — हाताने लिहिणारी, कीबोर्डवर टाईप करणारी, आणि आता प्रॉम्प्ट टाईप करणारी. पहिली पिढी लिहायची विचार करून, दुसरी पिढी लिहायची अनुभवातून, आणि आजची पिढी लिहिते तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून.

पत्रकारितेचं रूप बदललं, पण तिचं हृदय कुठेतरी मागे राहिलं आहे. शब्द अजूनही दिसतात, पण त्यांच्यातला “धडधड” हरवली आहे. संपादकीय आता लिहिलं जातं, पण जाणवलं जात नाही.

मला आठवतं — जेव्हा आम्ही संपादकीय लिहायचो, तेव्हा मनात एक प्रश्न नेहमी असायचा — “हे लिहिताना मी समाजासाठी काही बोलतेय का?” आज प्रश्न बदलला आहे — “हे ट्रेंड होतंय का?”

आणि तेव्हा वाटतं —
हो, काळ पुढे गेला, पण पत्रकारितेचा आत्मा मागेच राहिला.
आणि मी… अजूनही त्या आत्म्याचा शोध घेत आहे — अक्षरांमध्ये, आठवणीत, आणि काही वेळा… स्वतःमध्येच.

डॉ. वैदेही तामण
डॉ. वैदेही तामणhttps://authorvaidehi.com
डॉ. वैदेही तामण हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित पत्रकार, संपादक, लेखिका आणि मीडिया उद्योजिका आहेत. आफ्टरनून वॉइस या प्रमुख इंग्रजी आणि मुंबई माणूस या मराठी वेब पोर्टलच्या संस्थापक व मुख्य संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेला नीतिमूल्यांचा आधार देत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर स्पष्ट मत आणि प्रगल्भ विश्लेषण सादर केले आहे. त्यांच्या लेखकत्वाचे योगदानही लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी Sikhism vs Sickism, Life Beyond Complications, Vedanti — Ek Aghori Prem Kahani, Monastic Life: Inspiring Tales of Embracing Monkhood, आणि 27 Souls: Spine-Chilling Scary Stories ही विविध विषयांवर आधारित पुस्तके लिहिली आहेत. शिवाय Reclaiming Bharat: Veer Savarkar’s Vision for a Resilient Hindu Rashtra आणि Veer Savarkar: Rashtravaadachi Krantikari Yatra सारख्या साहित्यिक व वैचारिक ग्रंथांनी इतिहास, संस्कृति आणि विचार या बाबींना सखोल परिमाण दिले आहे. डॉ. तामण यांनी पत्रकारितेतून सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी यांना एक नवीन दिशा दिली आहे आणि त्यांच्या सर्जनात्मक लेखनाने वाचकांना विचार करण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या विविध भूमिका — पत्रकार, लेखक, उद्योजक व सायबर-सुरक्षा तज्ज्ञ — हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments