
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रत्येक टप्प्याचे काम वेळेत पूर्ण होईल याची खातरजमा केली.
ही योजना ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार असून जॅकवेल, ॲप्रोच ब्रिज, फिल्टर प्लॅंट यांसारख्या महत्त्वाच्या भागांचे काम गतीने सुरू आहे. पाहणीदरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महापालिकेचे सहआयुक्त देविदास टेकाळे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील तसेच प्रकल्प सल्लागार देशमुख उपस्थित होते.
आयुक्त पापळकर यांनी 26 MLD जलशुद्धीकरण प्रकल्प जूनअखेर पूर्ण करणे, जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू करणे आणि कंत्राटदारांनी यंत्रसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन प्रभावीपणे करावे, असे आदेश दिले. त्याचप्रमाणे २४ ठिकाणच्या जोडण्या, ३० टाक्यांचे बांधकाम व वितरण व्यवस्था यासारखी मागे पडलेली कामेही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.
जायकवाडी धरण क्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथील जलवाहिनी, फारोळा येथील 26 MLD जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडीतील 392 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र व संतुलन जलकुंभ याठिकाणी पाहणी करताना अडचणी जाणून घेण्यात आल्या.
या योजनेवर उच्च न्यायालयात जनहित याचिका सुरू असून, प्रशासनाकडून न्यायालयात वेळोवेळी माहिती सादर केली जाते. नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत योजनेबाबत बैठक झाली असून ऑक्टोबरपर्यंत ही योजना कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

