ठाणे : ठाण्यात एका बार आणि रेस्टॉरंटमधील कॅशिअरला पोलिसांनी मारहाण केली आहे. रात्री उशिरापर्यंत बार सुरु असल्याकारणानं ही मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रारही करण्यात आली आहे.
ठाण्याच्या श्रीनगर बागात श्रेया बार अँड रेस्टॉरंट आहे. रविवारी रात्री पोलिस निरिक्षक अशोक सायकर आणि २ कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना १ वाजण्याच्या हा बार उघडा दिसला. त्यामुळे सायकर यांनी बारमध्ये घुसून मारहाण सुरु केली. हॉटेल चालवण्यास रात्री १२.३० पर्यंत परवानगी असते, तरीही तुमचं हॉटेल १ वाजेपर्यंत सुरु का असं विचारत त्यांनी कॅशिअरला शिवीगाळही केली.
दरम्यान हा सर्व प्रकार बारच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ठाणे हॉटेल असोसिएशनने याप्रकरणी पोलिस आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे, तसंच मुख्यमंत्र्यांनाही तक्रार दिली आहे. ठाण्यासारख्या शहरांमध्ये रात्री १.३० ते २ पर्यंत हॉटेल सुरु ठेवता येतात. मात्र १२.३० वाजेपर्यंतच परवानगी असते असं सांगत कॅशिअरला मारहाण करणाऱ्या अशोक सायकरांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.