
राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. पती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत हा निर्णय घेण्यात आला. त्या आज सायंकाळी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले. ही बैठक दक्षिण मुंबईतील विधानभवन संकुलातील दिवंगत अजित पवार यांच्या कार्यालयात पार पडली.
बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचा धाकटा मुलगा जयही उपस्थित होता. विधानभवन परिसरात अनेक मंत्री व आमदार भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
लोक भवनाने दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज सायंकाळी ५ वाजता मुंबईत होणार आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सुनेत्रा पवार यांनी तुलनेने लो-प्रोफाइल ठेवला होता. त्या वर्षी बारामती मतदारसंघातून त्यांनी पतींच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती; मात्र त्या प्रतिष्ठेच्या लढतीत NCP (SP) च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती.

