
मुंबईतील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला टँकर मालकांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करत खासगी टँकर, विहिरी आणि बोरवेल्स जप्त केल्यानंतर ही कृती झाली. यानंतर मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे सरचिटणीस राजेश ठाकूर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही बेमुदत संप मागे घेतला असून, मुंबईतील पाणीपुरवठा तात्काळ सुरू केला जात आहे.”
हा संप 10 एप्रिलपासून सुरू झाला होता, जेव्हा बीएमसीने खासगी विहिरींच्या मालकांना नोटिसा पाठवल्या होत्या. या विहिरींचा वापर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी केला जात होता. त्यामुळे अनेक रहिवासी संकुले, रेल्वे व बांधकाम प्रकल्प यांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या निर्देशानंतर या विहिरी व बोरवेल मालकांना पाठवलेल्या नोटिसा 15 जूनपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेतल्याची घोषणा केली.

