
चौंडी येथे प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्याचा दावा करणारी जाहिरात चुकीची आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. लोकमत या वर्तमानपत्रात ही माहिती चुकीच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली असून, मूळ जाहिरात ही केवळ दीड कोटी (१.५ कोटी) रुपयांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
२१ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात लोकमत आणि पुढारी या दोन वृत्तपत्रांत छापण्यात आली. पुढारीमध्ये ती योग्य पद्धतीने प्रसिद्ध झाली, परंतु लोकमतमध्ये अंकाच्या शेवटी असलेला ‘टिंब’ (दशांश चिन्ह) हटवल्याने रक्कम १.५० कोटी ऐवजी थेट १५० कोटी वाटली. याच चुकीच्या आकड्याच्या आधारे काही लोकांनी समाजमाध्यमांवर ती शेअर केली आणि काही माध्यमांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या.
विभागाने स्पष्ट केले आहे की, संबंधित जाहिरात ही जाहिरातीच्या रिलीज ऑर्डरप्रमाणेच आणि संकेतस्थळावरही अचूक आहे. एका वृत्तपत्राच्या मुद्रितशोधनातील त्रुटीमुळे राज्य शासनाची अकारण बदनामी होऊ नये, यासाठी विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यासोबतच, पुढील जाहिरातींमध्ये निविदेची रक्कम अंकांसोबतच अक्षरी स्वरूपातही नमूद करावी, अशा सूचनाही विभागाने दिल्या आहेत.

