

डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल – संजय निरुपम
मुंबई महापालिकेचे जोगेश्वरी पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालय म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याचे करोडोंचे बजेट असताना या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सोयीसुविधांची वानवा आहे. रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध होत नाहीत, असे विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. ट्रामा केअर सेंटर रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई मनपाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा सुद्धा उपस्थित होते.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, या रुग्णालयामध्ये डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. पुरेसे आणि योग्य डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला ठराविक काम न देता अनेक कामे करून घेतली जातात. एकच कर्मचारी झाडूवाल्याचे काम करतो, तोच व्यक्ती वॉर्डबॉयचे काम करतो, सहकाऱ्याचे काम करतो, ड्रेसिंगचे काम करतो. अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना सुद्धा ती पदे भरली जात नाहीत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णांकडे काळजीपूर्वक लक्ष देता येत नाही. तसेच येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे देणे ही महापालिका रुग्णालयाची जबाबदारी आहे, पण या रुग्णालयामध्ये ती औषधें बाहेरून आणायला सांगितली जातात. या सर्वांमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही या रुग्णलयाचे प्रमुख अधीक्षक डॉ. बावा यांना भेटलो व त्यांना निवेदन केले की, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या सोयीसुविधा देणे, त्यांचा व्यवस्थित उपचार करणे, ही रुग्णालयाची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पडायला हवी.
मनपाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यावेळेस म्हणाले की, या रुग्णालयामध्ये भरपूर जागा उपलब्ध आहे, रुग्णांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक मशिन्स बसवता येऊ शकतात, तसेच येथील अति दक्षता विभागामध्ये (ICU) मध्ये फक्त रुग्णांसाठी १२ ते १५ बेड्स आहेत, त्यात २० ते २५ बेड्स आरामात बसू शकतील एवढी जागा आहे. तसेच या रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी खाजगी संस्थेमार्फत करारावर ठेवलेले आहेत. यावरूनच या रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा महापालिकेचा डाव आहे, हेच स्पष्ट होते. महापालिकेमध्ये बसलेल्या शिवसेनेने या रुग्णालयाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, त्या नावाला साजेशा सोईसुविधांतरी त्यांनी देणे अपेक्षित होते. आज शिवसेनेचे नेते बाळासाहेबांचे स्मारक बांधायच्या गोष्टी करतात, त्यांना माझे सांगणे आहे की, तुम्ही महापालिकेमध्ये सत्तेत राहून एक रुग्णालय नीट सांभाळू शकत नाहीत, तुम्ही बाळासाहेबांचे स्मारक काय बांधणार असा टोलाही रवी राजा यांनी शिवसेनेला दिला.