
बीड जिल्ह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग’ (सीआयआयआयटी) स्थापन करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांत ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून हे केंद्र स्थापन करण्याचे पत्रच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
या नव्या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळणार असून, बीडमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी १९१ कोटींपैकी १५ टक्के म्हणजे ३३ कोटी रुपयांचा खर्च बीड जिल्हा प्रशासन करेल, तर उर्वरित खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि त्यांच्या भागीदार कंपन्या व संस्था उचलतील.
अजित पवार यांनी २ एप्रिल २०२५ रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात सीआयआयआयटी प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडे सहकार्याचे आवाहन केले होते. कंपनीने त्यांच्या प्रस्तावाला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पुढाकार घेतला आहे.
हे केंद्र उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार प्रशिक्षण देईल. पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ करेल. त्यानंतर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलतील. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील युवकांच्या कौशल्यात भर पडणार असून, उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. परिणामी, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीस चालना मिळणार आहे.