
आद्यकवी मुकुंदराज यांच्या जन्मस्थळ असलेल्या अंबाजोगाईला “कवितेचे गाव” म्हणून जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. पुढील दोन महिन्यांत यासंबंधीची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, कवी मुकुंदराज समाधी स्थळ, शासकीय महाविद्यालय आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी ‘कवितेच्या गावातील दालन’ स्थापन केली जाणार आहेत.
श्री. सामंत हे आज अंबाजोगाई जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद साधण्यासाठी आले होते. या संवादानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या वेळी खासदार संदीपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि अनिल जगताप यांचीही उपस्थिती होती.
या साहित्यिक संवादात श्रीमती दीपा क्षीरसागर, विवेक निरगणे, संजय पाटील देवळाणकर, आनंद कराड, प्रभाकर साळेगावकर, सतीश साळुंके, बाळासाहेब पठारे, महेश वाघमारे, राजकिशोर मोदी आणि अतुल कुलकर्णी यांचाही सहभाग होता.
साहित्यिकांनी या वेळी आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ सध्या मुद्रित स्वरूपात उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करत त्याची पुनर्मुद्रणाची मागणी केली. यावर मंत्री सामंत यांनी तो ग्रंथ लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या घोषणेनंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तत्काळ आदेश काढत उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना या उपक्रमासाठी समन्वय अधिकारी तर उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना सहसमन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.