
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक मोहीम राबवून ७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत आक्षेपार्ह जाहिराती असलेली आणि मिसब्रँडेड औषधे जप्त करण्यात आली असून एकूण ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण स्वरूपात राबविण्यात येईल.
‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ तसेच इतर संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षित अन्न आणि औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी कोणत्याही औषधांच्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवून स्वतःहून औषधे सेवन करू नयेत, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. सेल्फ मेडिकेशनमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा उत्पादनांबाबत नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले.
तक्रार नोंदविणे अधिक सोपे व्हावे यासाठी एफडीएकडून लवकरच नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. संशयास्पद औषधे किंवा अवैध साठवणुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संबंधित आस्थापनेची माहिती देऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहआयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी सांगितले की, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी करून तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.
आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. ‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४’ च्या उल्लंघनाप्रकरणी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत नागपूर विभागात ७.२६ लाख रुपयांचा, नाशिकमध्ये ७.१० लाख रुपयांचा, पुण्यात १४.६८ लाख रुपयांचा, बृहन्मुंबईत १.८५ लाख रुपयांचा, कोकण विभागात १८.५८ लाख रुपयांचा, अमरावतीत १.४२ लाख रुपयांचा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ हजार ७१८ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागात तपासणीदरम्यान आढळलेल्या दोन एलोपथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल २१.८३ लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला.
एफडीएच्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे भ्रामक औषध जाहिराती आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

