
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईतील अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’ येथे उच्चस्तरीय सिव्हिल-मिलिटरी समन्वय बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकार आणि संरक्षण दलांमधील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. उद्देश होता – महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि नागरी भागांची सुरक्षा आणि सज्जता सुनिश्चित करणे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय संरक्षण दलांनी दाखवलेली अचूकता आणि कार्यक्षमतेचे कौतुक करताना त्याला “अभूतपूर्व” असे संबोधले. “मी संरक्षण दलांना सलाम करतो. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. गुप्तचर माहिती शेअरिंग आणि सायबर सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी मुंबईवर होणाऱ्या संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचा देशाच्या आर्थिक पायाावर होणाऱ्या परिणामाचा उल्लेख करत सायबर सुरक्षेची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, लेफ्टनंट जनरल, रियर अॅडमिरल, कमांडर आणि एअर व्हाईस मार्शल उपस्थित होते. लष्कराच्या महाराष्ट्र-गुजरात-गोवा क्षेत्राचे GOC लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा, नौदलाचे FOMA रियर अॅडमिरल अनिल जग्गी, हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल राजत मोहन हे प्रमुख उपस्थित होते.
याशिवाय RBI, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE), अँटी टेररिझम स्क्वॉड (ATS), होमगार्ड्स यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य सचिव आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले.

