मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी २१ ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
रक्षाबंधनप्रमाणचे भाऊबीजेलाही बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे सणासुदीला बहिण-भावांकडे जाताना मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हं आहेत.
२१ ऑक्टोबरला बेस्टच्या बसेस संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे ३२ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या ३८०० बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. ३० लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. बोनस जाहीर न झाल्यास १८ तारखेपासून २१ पर्यंत ऐन दिवाळीतच बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार आहेत.