
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त, १४ व १५ एप्रिल २०२५ रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राबवण्यात येत असून, बाबासाहेबांच्या कार्याचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा यामागील उद्देश आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली.
या विशेष टूर सर्किटमध्ये बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून, ही सहल सर्व नागरिक आणि पर्यटकांसाठी विनाशुल्क आहे. मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, प्रिंटिंग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालयाचा यात समावेश आहे. नाशिकमध्ये येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. नागपूरमध्ये दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार यांसारखी स्थळे समाविष्ट आहेत.
या उपक्रमामुळे बाबासाहेबांचे सामाजिक समता, शिक्षण, आणि संविधान निर्मितीमधील योगदान लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ही सहल बाबासाहेबांच्या समृद्ध वारशाची अनुभूती देऊन पर्यटकांना त्यांच्या जीवनदृष्टीशी जोडणार आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा हा उपक्रम सामाजिक क्रांतीचा संदेश पुढे नेण्यासाठी आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले की, बाबासाहेबांचे विचार आणि योगदान लक्षात घेता, ही सहल प्रेरणादायी ठरेल. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीसारखी स्थळे केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची प्रतीके आहेत. हा उपक्रम स्थानिक समुदायासाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण करेल.
सहल दरम्यान प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे पर्यटनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. टूर गाईड, अल्पोपहार, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका यांचाही समावेश आहे. या अनोख्या प्रयत्नाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

