मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले आहे. रॉयल्टी घोटाळा झाल्याचे कारण देत हे समन्स बजावण्यात आल्यामुळे बॉलिवूडला मोठा हादरा बसला आहे.
आदित्य चोप्रा याच्यासह ईडीने सोनी म्युझिक इंडियाचे उपाध्यक्ष श्रीधर सुब्रमण्यम, युनिव्हर्सल म्यूझिकचे देवराज संन्याल यांच्यावरदेखील रॉयल्टी घोटाळ्याशी संबंध असल्या प्रकरणी खुलासा देण्यासाठी बोलावले आहे.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हँकोस कंपनीचे प्रतिनिधी येत्या दोन दिवसांत कागदपत्रांसह ईडी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय. टी-सीरीजचे एमडी भूषण कुमार आणि ‘सारेगम’चे विक्रम मेहरा यांचा जबाब नोंदविल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ही भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात. परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने १ जून २००० रोजी याची स्थापना केली.