मुंबई: भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, सोमय्यांनी केला आहे. त्याबाबतचं पत्र त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना लिहिलं आहे.
धक्कादायक म्हणजे आमच्या मित्रपक्षाने ४ नगरसेवकांना किडनॅप केलं असून, त्यांना २ ते ४ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.
त्यातील एक नगरसेवक घाटकोपरचा आहे. त्याच्या परिवाराने आमच्याशी संपर्क साधला आहे, असंही सोमय्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनीही, मनसेचे काही नगरसेवक गायब असून त्यांना शिवसेनेनं विकत घेतल्याचा आरोप केला आहे.
पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसे चुकीचेच आहे. मनसेचे नगरसेवक फुटल्याची बातमी माझ्या कानावर सकाळी आली होती. या बाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना जो निर्णय घ्यायचा ते घेतील. अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढ
मुंबईतील प्रभाग क्र. ११६ मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.
त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ ८३ तर शिवसेनेची संख्या ८४ झाली आहे. मात्र शिवसेनेला ४ अपक्ष तर भाजपला २ अपक्षांची साथ आहे.
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप ८४ आणि शिवसेना ८३ अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = २२७
- शिवसेना अपक्षांसह – ८४+ अपक्ष ४ अपक्ष = ८८
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह – ८३+अपक्ष २= ८५
- कॉंग्रेस – ३०
- राष्ट्रवादी कॉंग्रेस – ९
- मनसे – ७
- सपा – ६
- एमआयएम – २