Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रया राज्यात खरंच कायद्याचे राज्य आहे का - शरद पवार

या राज्यात खरंच कायद्याचे राज्य आहे का – शरद पवार

महत्वाचे…
१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे २. कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अदयापही कळलेले नाही ३. शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून गडचिरोली येथून सुरुवात


गडचिरोली – सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण तर खूपच धक्कादायक आहे, आजच्या वर्तमानपत्रामध्ये नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. या सर्व गोष्टी पाहता या राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात अशा घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया पाहिली नाही, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
देशाचा विकासदर खाली आला आहे . खरे तर देशाचा विकासदर ८ टक्क्यांच्या वर असायला हवा. पण तसे न झाल्यामुळे वास्तव लपवण्यासाठी विकास दाखवण्याचे निकष बदलण्यात येत आहेत. मी लाभार्थी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीमध्ये फार गाजावाजा करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अदयापही कळलेले नाही. तसेच गोहत्याप्रकरणी केंद्र सरकारने संवेदनशील राहायला हवे. कालही राजस्थानमध्ये एक हत्या घडली आहे. केंद्राने राज्यांना सूचना देऊन या घटना थांबवायला हव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.
गडचिरोलीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हा हैदराबाद आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. हा जिल्हा विकास व दळणवळणापासून वंचित राहिला आहे. इथे विकास करायचा असेल तर फक्त पोलीस दल पुरेसे नसून इतर माध्यमातूनही काम केले जाणे गरजेचे आहे. हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ओळखले व तसे प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी स्वत:हून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागितले होते. गडचिरोलीचा विकास करण्यासाठी पाटील यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही मंत्रिमंडळात असताना सहकार्य केले. या सरकारनेही असे प्रयत्न करायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण आहे. हे चित्र काँग्रेससाठी अनुकूल आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहितीही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments