Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रदर्शन शाह अपहरण-हत्या प्रकरणी दोषीला जन्मठेप

दर्शन शाह अपहरण-हत्या प्रकरणी दोषीला जन्मठेप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रच लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खून खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. खंडणीसाठी दर्शनचं अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १ लाख ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि  सत्र न्यायाधीश एल. डी. बिले  यांनी हा निकाल मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी दिला.

कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं २५ डिसेंबर २०१२ रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर २५ तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती.

पोलिसांनी घटनेचा तपास करुन चारु चांदणे या आरोपीला अटक केली होती. मार्च २०१३ मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी २०१६ पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात ३० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २२ पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख ५ हजारांचा दंड ठोठावला. या दंडातील एक लाखाची रक्कम ही दर्शनच्या आईला देण्याचंही न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments