खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी केलेले त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शेवाळे यांच्याविरोधात साकिनाका पोलीस ठाण्यात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, या महिलेला मुंबईत येण्यासाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली होती. आपले राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामागे आदित्य ठाकरे असल्याचे गंभीर आरोप शेवाळे यांनी केले आहेत.
शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याचा आरोप केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी राहुल शेवाळेंविरोधात आक्रमक भूमिका धारण केली.
पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांनी सांगितले, “माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी हि गुन्हेगारी प्रवृत्तीची असून मला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यात येत आहे.”
पक्षातील लोकच त्या महिलेशी संपर्क करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं.
यावेळी, शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी NIA कडून करण्यात यावी अशी मागणी केली.