
पुण्यातील उद्योजक लक्ष्मण सधू शिंदे यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे. शिंदे यांचे प्रेत मंगळवारी बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात सापडले. ते 11 एप्रिल रोजी पाटणा विमानतळावर उतरले होते.
पोलिसांनी सांगितले की, या अपहरण आणि खुनामागील मुख्य सूत्रधारालाही अटक करण्यात आली असून, चौकशीसाठी आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींमध्ये रंजीत पटेल उर्फ मुन्ना, विपात्र कुमार, लालबिहारी, विकास उर्फ मोहित, कुंदन कुमार, संगीता कुमारी आणि सचिन रंजन यांचा समावेश आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्यांची आणि मुख्य सूत्रधाराची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अवकाश कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, “शिंदे यांचे कुटुंबीय पाटणा विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली होती.” प्राथमिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून एक विशेष पथक नेमले.
शिंदे यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी वैशाली जिल्ह्यातून जप्त करण्यात आली असून, गाडीचा मालक विपात्र कुमारला ताब्यात घेतल्यावर त्याने इतर आरोपींची माहिती दिली. पोलिसांनी नंतर नवादा, गया, नालंदा आणि वैशाली जिल्ह्यातून एकूण ११ जणांना पकडले असून त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासात हे आरोपी बहुराज्यीय गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे आरोपी खंडणी, अपहरण आणि खुनाच्या अनेक प्रकरणांमध्ये झारखंड, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांमध्येही गुंतलेले आहेत. त्यांनी शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून सुमारे ९०,००० रुपयांची खंडणी उकळली होती. मात्र पूर्ण रक्कम न मिळाल्याने त्यांनी त्यांचा खून करून मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी परिसरात फेकून दिला.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की काही आरोपी सायबर गुन्ह्यांतही सहभागी होते. पुणे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील खाण प्रकल्पासाठी कोट्यवधींच्या मशिनरी पुरवठ्याचा बनावट ईमेल पाठवून शिंदे यांना पटन्यात बोलावण्यात आले होते. ते ‘सेंट्रीफ्यूगल कास्टिंग बेअरिंग’ या खेडशिवापूर (पुणे) येथील कंपनीचे मालक होते.
११ एप्रिल रोजी पटन्याला पोहोचल्यावर सायंकाळी ८.३० वाजता त्यांनी आपल्या मुलीला झारखंडला जात असल्याचा मेसेज केला, त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. १२ एप्रिल रोजी कुटुंबीयांनी कोथरूड पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक पटन्यात पाठवण्यात आले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी पाटणा विमानतळाबाहेर शिंदे यांचे अपहरण झाल्याचे निष्पन्न केले.