
लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे AI171 हे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. अपघातात अनेकांच्या जखमी होण्याची आणि जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.
बोईंग विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच वेगाने उंची गमावली आणि दुपारी अंदाजे २ वाजता मेघाणी नगर परिसरात कोसळले. या ठिकाणापासून अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ काही किलोमीटरवरच आहे.
एअर इंडियाने अधिकृतपणे X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, “AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक विमान आज, १२ जून २०२५ रोजी दुर्घटनेत सापडले. सद्यस्थितीत तपशील मिळवण्याचे काम सुरू असून लवकरच अधिक माहिती http://airindia.com आणि X हँडलवर शेअर करण्यात येईल.”
अपघातानंतर घटनास्थळी काळा धूर मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसून आला. काही मिडिया टीम्सने घटनास्थळी जाऊन विमानाच्या अवशेषांचे थरकाप उडवणारे दृश्य चित्रीत केले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी तत्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक दाखल झाले. उपपोलीस आयुक्त कनन देसाई यांनी सांगितले की, “अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.”
अग्निशमन अधिकारी जयेश खादिया यांनी सांगितले की, आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले असून मदत आणि बचावकार्य जोमाने सुरू आहे.
हातातोंडाशी आलेला जीव धोक्यात आला असला तरी बचाव कार्य जलद आणि प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे प्राथमिक अहवालांवरून समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Air India आणि DGCA याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

